Pimpri : अनधिकृत बांधकामाबाबत पिंपरीतील सोसायटीला महापालिकेची नोटीस

एमपीसी न्यूज – रहिवासी सोसायटीचे बांधकाम करताना काही बाबी अनधिकृतपणे केल्या असल्याच्या कारणावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी मधील कोहिनुर वायोना सहकारी गृहरचना संस्थेला नोटीस बजावली आहे. बेकायदेशीर बांधकाम येत्या पंधरा दिवसात काढून घ्यावे अन्यथा  महापालिका कारवाई करेल असा इशारा देण्यात आला आहे.

कोहिनुर वायोना या सोसायटीमध्ये पार्किंगच्या जागेत सोसायटीचे कार्यालय बांधण्यात आले आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर मंदिराचे बांधकाम, महापालिकेच्या रस्त्यावर सोसायटीचे लोखंडी गेट बसविले आहे. तसेच काही नागरिकांनी महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता सदनिकांच्या बाल्कन्या बंदिस्त केल्या आहेत. विनापरवाना स्टोअर हाऊसचेही बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत लोक जनशक्ती पार्टीचे पुणे जिल्हा शहर अध्यक्ष विनोद भालेराव यांनी महापालिकेला अर्ज दिला होता. त्याबाबत महापालिकेने प्रत्यक्ष पाहणी करून बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीस बजावली आहे.

पुढील पंधरा दिवसात सोसायटीने केलेले अनधिकृत बांधकाम तसेच सदनिकाधारकांनी केलेले अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत बांधकाम काढून न घेतल्यास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.