Talegaon : तळेगाव नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोठी कारवाई ,80 पेक्षा अधिक टपऱ्या जमीनदोस्त 

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन चौक  ते एसटी  बस स्थानक  या मार्गावरील तसेच तळेगाव स्टेशन चौकातील सुमारे 80 पेक्षा अधिक टपऱ्या 
नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी जमीनदोस्त केल्या.यामध्ये 4   ते 5 पक्क्या घरांचाही समावेश आहे.या कारवाईने स्टेशन चौक आणि  रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
यामुळे स्टेशन चौकाला छावणीचे स्वरूप आले होते. कारवाईवेळी  बघ्यांनी मोठी गर्दी   केली होती. अतिक्रमण काढलेल्या जागेवर रस्ता रुंदीकरण  करण्यात येणार आहे. तळेगाव स्टेशन ते एसटी स्टँड या मार्गावर अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला होता.एसटी बस चालकांना आणि दुचाकीस्वरांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत होता. या अतिक्रमण कारवाईमुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
लेखी  सूचना करूनही व्यापाऱ्यांनी  अतिक्रमण संदर्भात योग्य दखल न घेतल्याने नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.मात्र अशा प्रकारच्या नोटिस
न मिळाल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे.

गुरुवारी ,(दि.13) रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे ,विविध खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, पोलीस निरीक्षक नारायण पवार, मसाजी काळे,सतीश पवार,अजित दळवी,वैभव सोनवणे, अशोक जगताप,निलेश बोकेफोडे,नगररचनाकार
शरद पाटील, अमित भोसले, मयूर मिसाळ, रवींद्र  काळोखे,संभाजी भेगडे,पी.डी.शिंदे,पोलीस कर्मचारी अनंत रावण ,दिलीप भरेकर,मनोज गुरव,
युवराज वाघमारे,चैताली भेके,यांच्यासह एकूण 60 सशस्त्र पोलीस दलाच्या उपस्थितीत अतिक्रमण  कारवाई सकाळी 11:30 च्या सुमारास सुरु करण्यात आली.पोकलंड,५ जेसीबी यंत्र,  डंपर यांच्या सहाय्याने  अतिक्रमणे हटविण्यात आली .नगरपरिषदेतील बांधकाम, आरोग्य, अतिक्रमण आदि विभागातील सर्वच कर्मचारी सक्रियपणे अतिक्रमण काढत होते. 22 नोव्हेंबर नंतर तळेगाव स्टेशन हद्दीतील  ही दुसरी मोठी कारवाई आहे.अतिक्रमण काढताना नगरपरिषद अधिकारी व नागरिक यांच्यात काही ठिकाणी शाब्दिक चकमकी उडाल्या.शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठपोलीसनिरीक्षक भानुदास जाधव यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना दिली.गेल्या अनेक वर्षांपासून थाटलेली दुकाने डोळ्यादेखत तुटत असल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते.
दरम्यान,तळेगाव स्टेशन येथील शुभम कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस असलेली भाजी मंडई जमीनदोस्त करण्यात आली.ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.