Pune : साहित्य प्रकारातील आईच्या विविध रुपांचे घडले विश्वरूप दर्शन !

'जननी' एकपात्री प्रयोगाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत अंजली कऱ्हाडकर प्रस्तुत ‘जननी’ एकपात्री प्रयोगाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

‘जननी’ म्हणजे आईची महती साहित्यातील विविध प्रकारांमध्ये वर्णिली आहे. अंजली कऱ्हाडकर यांनी ‘जननी ‘कार्यक्रमाअंतर्गत साहित्यातील अनेक व्यक्तिरेखा, स्वगते, नाट्यपदे, नाट्यछटा म्हणून साभिनय सादर केल्या.

‘अनंतयुगाची जननी ‘हा समर्थ रामदासांच्या अभंगाने कार्यक्रमाचा आरंभ झाला . ‘ वीज म्हणाली धरतीला ‘ हा राणी लक्ष्मीबाईंचा वि .वा .शिरवाडकर लिखीत नाट्यप्रवेश अतिशय जोशपूर्ण आणि त्वेषात सादर झाला. बहिणाबाईंच्या ‘आज माहेराला जाणे ‘ या कवितेतून सासुरवाशिणीचे भावविश्व उलगडले.
नाट्य छटाकार दिवाकर यांची ‘ चिंगी महिन्याची ‘ ही नाट्य छटा त्यांनी सादर केली. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे तेंव्हा आताची आधुनिक माता कशाप्रकारे मुलांना विविध क्लास लावते, स्पर्धेत टिकण्यासाठी त्यावरील नाटिका सादर केली.

मंगेश पाडगांवकर यांची ‘चिऊताई ‘ ही कविता सादर करण्यात आली.सुधा मूर्ति यांची ‘गौरम्मा ‘ ही रचना सादर झाली. वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली ‘आणि ‘अखेरचा सवाल’ हे नाट्य प्रवेश सादर झाले. बालगंधर्व यांचे ‘ नाही मी बोलत नाथा ‘ हे नाट्य पद गाऊन साभिनय सादर केले. कार्यक्रमाची सांगता तुकाराम महाराजांच्या ‘ मायेविण बाळ ‘या अभंगाने झाली.

अंजली क-हाडकर यांना प्रांजली पाध्ये यांनी संवादिनीची तर अमित अत्रे यांनी तबल्याची साथ केली. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.