Chinchwad : मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी

सलील कुलकर्णी, संदीप खरे, शरद पोंक्षे, राकेश चौरसिया हे महोत्सवाचे आकर्षण

एमपीसी न्यूज – महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांचा 457 वा संजीवन समाधी महोत्सव सोमवार (दि. 17 डिसेंबर) ते गुरुवार (दि. 27 डिसेंबर) दरम्यान संपन्न होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवडकरांना विविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी, कवी संदीप खरे, राकेश चौरसिया हे कलाकार यावर्षीच्या महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत. शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे. आपलं घर पुणेचे संस्थापक विजय गजानन फळणीकर यांना या वर्षीचा श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देव महाराज यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, ऍड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेवक करूणा चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

चिंचवड येथे श्रीमोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणावर (देऊळमळा) सोमवार (दि. 17 डिसेंबर) रोजी सायंकाळी सहा वाजता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, हवेली पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, पंढरीनाथ पठारे, आळंदी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे, रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विजय दरेकर आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, प्रवचन, भजन व मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी, कवी संदीप खरे, रघुनंदन पणशीकर, राकेश चौरसिया यांचे गायन व वादनाचे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार (दि. 25 डिसेंबर) रोजी सकाळी सात वाजता संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ यांच्या वतीने सामुहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे. सोमवार (दि. 17) ते रविवार (दि. 23) रोजी सकाळी नऊ वाजता श्रीमोरया गोसावी चरित्र पठण, विविध भजनी मंडळांची भजनसेवा होणार आहे.

सोमवार (दि. 24 डिसेंबर) रोजी सकाळी सहा वाजता मोरया गोसावी यांच्या समाधीची महापूजा चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते होईल. सकाळी सात वाजता शालेय विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करतील. त्यानंतर नऊ वाजता वल्लभ मुंडले गुरुजी जप आणि हवन करतील. दुपारी दोन वाजता कै. अखिल शरद लुणावत यांच्या स्मरणार्थ आरोग्य व दंत चिकित्सा व मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता शंकर शेवाळे महाराज यांचे ‘श्री चिंतामणी महाराज व श्री तुकाराम महाराज भेट’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री आठ वाजता सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

मंगळवार (दि. 25 डिसेंबर) रोजी सकाळी नऊ वाजता सामूहिक महाभिषेक होईल. सकाळी साडेनऊ पासून रक्तदान शिबीर सुरु होणार आहे. शिबिराचे उदघाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुणे येथील एटीएस प्रमुख भानुप्रताप बर्गे यांचे ‘दहशतवाद, भारतासमोरील एक आव्हान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री आठ वाजता रघुनंदन पणशीकर आणि सहकलाकार अभंग, भक्तिगीते व नाट्यपदांचा ‘सुगम संगीत’ कार्यक्रम सादर करतील.

बुधवार (दि. 26 डिसेंबर) रोजी सकाळी सहा वाजता गोंदवलेकर महाराज आरती मंडळ काकड आरती करणार आहेत. सकाळी नऊ वाजता महिलांचे सामुदायिक श्री सूक्त पठण व कुंकुमार्जन, साडेनऊ वाजता वैद्यकीय शिबीर होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर रात्री नऊ वाजता बासरीवादक राकेश चौरसिया, तबला वादक विजय घाटे आणि पखवाज वादक भवानी शंकर यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे.

गुरुवार (दि. 27 डिसेंबर) रोजी मोरया गोसावी यांच्या समाधी दिवशी पहाटे साडेचार वाजता मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते समाधीची महापूजा व अभिषेक करून सकाळी सात वाजता भव्य दिंडी व श्री मोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. काल्याच्या कीर्तनानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

काही मुख्य कार्यक्रम –

# सोमवार (दि. 17) ते रविवार (दि. 23) रोजी दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत हभप प्रमोद महाराज जगताप यांचे ‘ज्ञानेश्वरीमधील गणेश’ या विषयावर प्रवचने होणार आहेत.

# 18 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता हभप सदानंद ताम्हणकर यांचे नारदीय कीर्तन होईल.

# 19 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता उचगांवकर सर यांचे योगासन वर्ग होणार आहे.

# 20 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता पायल नृत्यालय तर्फे नृत्यकला हा कार्यक्रम होईल.

# 21 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता माधुरी वैद्य आणि राजेश्वरी जोशी हे भावगीत व नाट्यसंगीत कार्यक्रम सादर करणार आहेत.

# 22 डिसेंबर रोजी हनुमान भजनी मंडळ चिंचवडगाव यांची भजनसेवा सादर होईल.

# 23 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता हभप श्रेयस बडवे आणि मानसी बडवे यांची कीर्तन जुगलबंदी होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.