Talegaon: हुकूमशाही पध्दतीने अतिक्रमण निर्मूलन कारवाई थांबवावी, अन्यथा लोकशाही पध्दतीने रास्ता रोको आंदोलन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासन हुकूमशाही पध्दतीने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करीत असून चुकीच्या पद्धतीची ही कारवाई कायमची  थांबवावी , अन्यथा मंगळवारी ( दि.18 ) तळेगाव-चाकण रस्त्यावर तळेगाव स्टेशन चौक येथे लोकशाही पध्दतीने  रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल , असा इशारा माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी दिला.

तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन  कारवाईत झळ बसलेले व्यावसायिक आणि पीडित नागरिक यांची नगरपरिषदेच्या सभागृहात  शनिवारी बैठक आयोजित केली होती,त्यावेळी बाफना बोलत होते.

यावेळी समितीचे गटनेते किशोर भेगडे,माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ चौधरी,कृष्णा कारके,नगरसेवक आनंद भेगडे, अरुण माने,नगरसेविका वैशाली दाभाडे,माजी नगरसेवक दिलीप खळदे,सुदर्शन खांडगे,रामभाऊ गवारे,नंदकुमार कोतुळकर,धोंडीबा मखामले,दिलीप राज गुरव,आनंदराव देशमुख,
अशोक काकडे,जितेंद्र खळदे,किशोर राजस,धनंजय देशमुख,मिलिंद अच्युत,आशिष पाठक,दिलीप कुल,जगदीश कोराड,शिवाजी आगळे,गफूरभाई मुलाणी,ऍड.सचिन नवले,दीपक काकडे… परबते यांच्यासह व्यापारी व  नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बाफना म्हणाले,लोकशाहीत लोकप्रतिनिधीचे स्थान महत्वाचे आहे.  नागरिकांचे हित पाहणे अपेक्षित आहे.चुकीच्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईवर टीका करताना   बाफना म्हणाले,अतिक्रमण कारवाईत झळ बसलेल्याना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून दिला जाईल.नगरपरिषद प्रशासनाच्या ताठर भूमिकेवर त्यांनी यावेळी सडकून टीका केली.

तळेगाव स्टेशन ते एसटी डेपो हा डीपी रोड नसतानाही डीपी रोडचे निकष लावून केलेली ही अतिक्रमण निर्मूलन कारवाई अत्यंत चुकीची असून यामागे सत्ताधारी पक्षाचा हात असल्याचा आरोप किशोर भेगडे यांनी यावेळी केला.भेगडे यांनी सत्तारूढ पक्ष आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारावर टीका करताना सुभाष मार्केट बांधकामात सुमारे 4.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. अवाजवी करवाढ धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.

ते म्हणाले, तळेगाव नगरपरिषदेने चालविलेली अतिक्रमण विरोधी मोहिम ही सद्यस्थितीत चेहेरे पाहून चालू आहे की काय! असा संशय येतो. अतिक्रमण विरोधी मोहिम आहे की, सक्तीचे भूसंपादन आहे. याचा प्रशासनाने समाधानकारक खुलासा केलेला नाही. प्रशासन सत्ताधार्यांच्या मर्जीप्रमाणे नागरीकांच्या हितास बाधा आणणारे निर्णय राबवीत आहेत.

सक्तीच्या भूसंपादनामुळे लोकांना मानसिक त्रास देण्याचा कुटील डाव सत्ताधारी, प्रशासनास हाताशी धरून करत आहेत. सक्तीचे भूसंपादन करताना तुमची पंधरा मीटर, पंचवीस मीटर जागा घेऊ अशी भिती लोकांना दाखवून, भितीचे वातावरण निर्माण करून लोकांना भयभीत केले आहे;परंतु लोकांनी कोणत्याही भितीला न घाबरता खंबीरपणे रहा. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. असे आवाहन ही भेगडे यांनी केले.
एकीकडे बेघरांना घरे देऊ असे अभिवचन द्यायचे अन दुसरीकडे प्रस्थापितांना विस्थापित करायचे, यामुळे भाजपाचा खरा चेहरा या करवाढीतून आणि भूसंपादनातून जनतेसमोर येईल. यांना जनतेचं कुठलं देणं घेणं नाही.स्वताच्या मालकीची अनेक वर्षांची दुकाने, कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता बळाचा वापर करून, व्यापार्यांना कोणतीही नुकसान भरपाई बाबतची आणि पर्यायी व्यवस्था न करता प्रशासन ही कारवाई करत आहे; हेच भाजपाचे “अच्छे दिन” का? असा उपरोधीत टोलाही भेगडे यांनी लगावला.

यावेळी ऍड .सचिन नवले आणि दिलीप  राजगुरव यांनीही मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.