India Corona Update : 80 लाख रुग्ण झाले बरे, सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांच्या आत 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 50 हजार 326 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशातील 80 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.79 टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांच्या आत आली आहे. 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात
44 हजार 281 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 86 लाख 36 हजार 012 एवढी झाली आहे. त्यापैकी 80 लाख 13 हजार 784 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, सध्या देशात 4 लाख 94 हजार 657 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 512 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत 1 लाख 27 हजार 571 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.47 टक्के एवढा आहे.

देशात 12 कोटी कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 11 लाख 53 हजार 294 नमूणे तपासण्यात आले आहेत. यासह देशातील आतापर्यंत पूर्ण झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या 12 कोटी 07 लाख 69 हजार 151 एवढी झाली आहे. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासांत 7 हजार 830 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली तर, केरळमध्ये 6 हजार 10 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या घटली असून बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील 24 तासांत देशभरात 3 हजार 791 नवे रुग्ण आढळले आहेत तर, 10 हजार 769 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.