महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे राज्यातील 8000 कर्मचारी बेमुदत संपावर; पुण्यातील 500 कर्मचा-यांचा सहभाग

शासनात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी पुकारला संप

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शासनात समाविष्ट करावे, कर्मचाऱ्यांचे वेतन-भत्ते शासनामार्फत देण्यात यावेत या मागणीकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी महासंघाच्या राज्यातील 8 हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे अस्त्र उचलले आहे. यात पुण्यातील 500 अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2015 च्या नागपूर अधिवेशनात या मागण्यांवर 3 महिन्यात कार्यवाही करू, असे आश्वासन दिले होते. 14 महिन्यात कोणतीही कार्यवाही न झाल्याने मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप 6 मार्चपासून सुरू करण्यात आल्याने प्राधिकरणाचे कामकाज ठप्प झाले आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. पुण्यातील लष्कर भागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघर्ष समिती, कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र पाणी पुरवठा जलनिःस्सारण अभियंता संघटना यांचे प्रतिनिधी, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. बी. डी. यमगर (मुख्य अभियंता ), एन एन भोई (कार्यकारी अभियंता,वैशाली आवटे (कार्यकारी अभियंता ), बी. पी. पिंगळे, एन. पी. कुलकर्णी, तसेच महासंघाचे अध्यक्ष अॅड. आर. बी शरमाळे, कार्याध्यक्ष बबलू म्हेत्रे, खजिनदार सोमा दाते, सरचिटणीस आर. व्ही. जाधव, सलीम शेख, संजय केळकर, दीपक म्हस्के, अग्निहोत्री आदी पुण्यातील आंदोलनात सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.