Ahamadnagar : शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन, त्याग आणि समाधान या पंचसूत्रीचा अवलंब करावा – अण्णा हजारे 

गिरीश प्रभुणे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान 

एमपीसी न्यूज – आज, उद्या काय करावं हे ठरविण्यापेक्षा जीवनात काय करावं हे ठरविता आले पाहिजे. दुस-यांना दिलेल्या आनंदातच आपला आनंद शोधता आला पाहिजे. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि समाधान या पंचसूत्रीचा अवलंब करावा, असे मार्गदर्शन  पद्मभूषण तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे केले. ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. गिरीश प्रभुणे यांचा हजारे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला.

आशिया मानवशक्ती विकास संस्था आणि लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.16) अहमदनगर, राळेगणसिद्धी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये आयोजित ‘शिक्षक प्रतिभा कुटुंब स्वास्थ संमेलना’त हजारे यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. गिरीश प्रभुणे होते. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, नागेश वसतकर, डॉ. अशोक शिलवंत,मुरलीधर साठे कवयित्री मानसी चिटणीस उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ”जिल्हा परिषदेची वाबळेवाडीची शाळा आदर्श शाळा आहे. या शाळेसारखा दर्जा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये निर्माण व्हावा. त्यादृष्टीने आमचे कार्य सुरु आहे. आशिया मानवशक्ती विकास संस्था आणि लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या सहकार्याने महापालिकेतील सर्व शिक्षकांची प्रतिभा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.

‘शैक्षणिक मूल्य आणि आजची कुटुंब व्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. सबनीस म्हणाले, ”शिक्षकाची विवेकशील प्रतिभा आणि कुटुंबातील सदस्यांची जागरुकता एकत्र आल्यास, सुसंस्कारित समाजाची निर्मिती होऊ शकते. अभ्यासक्रम शिकविताना शब्दाच्या पलिकडचे ज्ञान देता आले पाहिजे. सरकारने अभ्यासक्रमात दिलेला रंग किती गडद करायचा आणि किती फिकट करायचा याचा विवेक शिक्षकाकडे असायला हवा”.

पुरस्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे म्हणाले, ”जातीच्या भिंती तोडून मातीशी नाळ जोडणे आवश्यक आहे. भटक्या विमुक्त जातींच्या लोकांमध्ये असलेले पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक ज्ञान यांची सांगड घातली पाहिजे. शिक्षकांनी समरस होऊन अध्यापन केल्यास नक्की परीवर्तन होऊ शकते. पूर्वीची संस्कृती पुन्हा निर्माण झाली पाहिजे. शिक्षक हा मातेपेक्षा अधिक महत्वाचा आहे. शेतकरी जेव्हा एक दाना पेरतो, तेव्हा त्याचे शंभर दाने होताता, असे अनेक दाने निर्माण करण्याची प्रतिभा शिक्षकांमध्ये आहे. म्हणून हे संमेलन शिक्षकांच्या प्रतिभेचे आहे”.

टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर म्हणाले, ”मोबाईल, टीव्हीच्या पडद्यातून बाहेर पडण्यासाठी आजच्या पिढीला शाळेविषयी आस्था निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षकांनी स्वत:चे शारिरीक व मानसिक आरोग्य जपणे अतिशय महत्वाचे आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाने संपन्न नवीन पिढीसाठी एकरुप होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जास्त मोकळीक देऊन त्यांच्यासाठी एकरुप झाले पाहिजे”.

”शिक्षकांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित राहिले तरतच समजाचे एकंदर आरोग्य राखले जाईल. त्यासाठी शिक्षकांनी सामाजिक बदलाप्रमाणे स्वत: बदल केला पाहिजे. इतिहास संपला आहे. सध्याच्या परिस्थिती वर्तमानाची आव्हाने सर्वांना पेलविणारी नाहीत. त्यामुळे पालकत्वाला विवेकाची जोड दिली. तरच, विद्यार्थी घडू शकतो”, असेही पारळकर म्हणाले.

सद्यस्थितीत कुटुंबाचे होणारे विघटन, वृद्धाश्रम आणि पाळणाघरांची वाढती संख्या, भारतीय संस्कृतीचा ऱ्हास यावर चिंतन व्हावे या उद्देशाने ‘शिक्षक प्रतिभा कुटुंब स्वास्थ संमेलन’ भरविण्यात आले होते. यामध्ये शैक्षणिक मूल्य आणि आजची कुटुंब व्यवस्था यावर विचारमंथन करण्यात आले. तसेच कविसंमेलन, कथाकथन पार पडले.

पहिल्या सत्रात ‘आयुष्याच्या वळणावर’ कविसंमेलन झाले. ख्वाडा आणि हैद्राबाद कस्टडी फेम गीतकार विनायक पवार, कवी अरुण पवार, कवी प्रा. अशोकराव शिंदे यांनी कवितांचे सादरीकरण केले. त्यानंतर झालेल्या कथाकथनात ज्येष्ठ कथाकार संजय कळमकर यांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. गिरीश प्रभुणे यांचा हजारे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला.  तर, महाराष्ट्रातील झिरो एनर्जी शाळा असलेल्या शिक्रापूर, वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला ‘संस्कारक्षम’ शाळेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

संमेलनाचे निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले, प्रा. दिगंबर ढोकले होते. मुकुंद आवटे,  अनिल कातळे, राजेंद्र वाघ यांनी संयोजनात पुढाकार घेतला. संयोजन समितीतील श्रीकृष्ण अत्तरकर, जयवंत भोसले, रोहित खर्गे, अरुण गराडे, बाजीराव सातपुते, हनुमंत देशमुख, संदीप कानडे यांचे संमेलन यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले. महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, अ.भा. मराठी नाट्य परिषद भोसरी यांचे देखील  मोलाचे सहकार्य मिळाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. भोजापूर गोल्डचे लायन्स क्लबचे अध्यक्ष  सुदाम भोरे यांनी स्वागत केले. तर, आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश वसतकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजानाचा हेतू सांगितला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.