Talegaon : जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वत:वर विश्‍वास हवा : वर्धमान जैन

एमपीसी न्यूज – प्रयत्न केल्यास यश निश्‍चित मिळते. विद्यार्थीजीवनच योग्य मार्ग निवडण्याची सर्वात चांगली वेळ आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर आपला स्वत:वर विश्‍वास हवा, असे प्रतिपादन चार्टर्ड अकाउंटंट वर्धमान जैन यांनी केले.तळेगाव दाभाडे येथे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित चौथ्या मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत ‘उद्याचा यशस्वी नागरीक’ या विषयावरील व्याख्यानात जैन बोलत होते.

यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष गोरख काळोखे, कार्यवाह रामदास काकडे, विश्‍वस्त मुकुंद खळदे, चंद्रकांत शेटे, शैलेश शहा, दीपक शहा, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. बी.बी. जैन, निरुपा कानिटकर आदी उपस्थित होते.

जैन यांनी सांगितले, की तुम्ही जिथे आहात तेच सुरुवात करण्याचे योग्य ठिकाण आहे. तुम्ही कोणत्या कौटुंबिक पार्श्‍वभूमितून आलात, हे महत्त्वाचे नाही, तर तुमचे लक्ष्य काय आहे, हे ठरवले पाहिजे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द असणेही तितकेच गरजेचे आहे. आपली स्वप्ने लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. आपल्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्वाभिमानाची नितांत आवश्यकता असते. नेहमी संगतही चांगल्यांशीच ठेवली पाहिजे. आपला वावरही यशस्वी लोकांसोबतच असला पाहिजे. त्यांचे विचार आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जीवनात काय बनायचे आहे ? आपले संकल्प काय आहेत ? यावरही तुमचे यश अवलंबून असते. दैनंदिन वाटचाल करीत असताना आपला रोलमॉडेल ठरवून त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. त्यामुळे त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण करायला लागू. महत्त्वाचे म्हणजे आपला आपल्यावर विश्‍वास हवा. आपला विश्‍वासच आपले ध्येय गाठण्यास मदत करेल. जीवनात अशी व्यक्ती बना की लोकांनी तुम्हाला फेसबुकवर लाईक करण्यापेक्षा गुगलवर सर्च केले पाहिजे. तेव्हा तुम्ही यशस्वी झालात, असे म्हणता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.