Pimpri: ‘पीसीएनटीडीए’चे अध्यक्ष सदाशिव खाडे यांचा महासभेत सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या ( पीसीएनटीडीए ) अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त सदाशिव खाडे यांचा आज (शुक्रवारी) महासभेत सत्कार करण्यात आला. दरम्यान,  पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने शेत जमीन संपादित केलेल्या शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही  खाडे यांनी यावेळी दिली. तसेच महापालिका हद्दीतील  प्राधिकरणाकडे असलेल्या प्रलंबित  प्रश्नांवर बैठक घेऊन तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदाशिव खाडे यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, विरोक्षी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, माजी महापौर मंगला कदम, आयुक्त श्रावण हर्डीकर आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना खाडे बोलत होते.

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना घरे बांधून देण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. यासाठी निगडी, चिखली, वाल्हेकरवाडी परिसरातील शेतक-यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्यातील 470 लाभार्थ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळाला आहे. तर 188 लाभार्थ्यांना अद्याप साडेबारा टक्के परतावा मिळाला नाही. त्यादृष्टीने कामकाज सुरू असून सर्वांना परतावा देण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे खाडे यांनी सांगितले. प्राधिकरणाच्या स्थापनेपासून 11 हजार 500 घरे बांधली आहेत. आपण येत्या काळात 14 हजार 500 घरे बांधणार असून 6 हजार घरांच्या कामाची निविदा झाली आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, प्राधिकरणाचा 14 वर्षांनंतर वनवास संपला असून भाजपने निष्ठावंत, प्रामाणिक सदाशिव खाडे यांना अध्यक्ष पद देऊन त्यांचा उचित सन्मान केल्याच्या भावना सर्व पक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केल्या. यावेळी राज्य सरकारच्या किमान वेतन आयोगाच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक केशव घोळवे यांचाही सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.