Chikhali: संतपीठाचा मार्ग मोकळा; पाच कोटीच्या खर्चाला स्थायीची मंजुरी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’च्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. संतपीठासाठी महापालिकेने 40 कोटी रुपयांचा खर्च गृहित धरला असताना कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या आहेत. त्यामुळे 40 कोटींच्या कामाला आता पंचेचाळीस कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. पाच कोटीच्या वाढीव खर्चासह 45 कोटीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज (शुक्रवारी) मंजुरी दिली.

भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा अन् वारकरी सांप्रदायाचे पारंपारीक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने हे ‘संतपीठ’ उभारण्यात येत आहे. टाळगाव चिखलीला सांप्रदायिक वारसा असून शेजारीच श्री क्षेत्र आळंदी, देहू या तिर्थक्षेत्रांचे सानिध्यही लाभले आहे. त्यामुळे टाळगाव चिखली येथे राज्यातील पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये उभारण्यात येणा-या या संतपीठ उभारणीला 13 मे 2015 रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आली.

त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील 1 हेक्टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्चपदवीपर्यंतचे केवळ संतसाहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतीगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथील शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात येणारे हे संतपीठ आणि त्याअनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.

संतपीठाच्या इमारत बांधकामासाठी महापालिकेतर्फे 40 कोटी 61  लाख रुपयांची निविदा मागविण्यात आली. मेसर्स बी. के. खोसे यांनी 11.16  टक्के जादा, व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी 14.70  टक्के जादा, तर एस. एस. साठे यांनी 16 टक्के जादा दराने निविदा सादर केल्या.बी. के. खोसे यांनी सादर केलेली वाढीव दराची निविदा स्वीकारण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. त्यानुसार म्हणजेच 44 कोटी 61  लाख 73 हजार 323 रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस 36  लाख 92 हजार 264 आणि मटेरिअल चार्जेस 10 लाख 31 हजार 477 रुपये असे एकूण 45 कोटी 8 लाख 97 हजार 64 रुपये इतका खर्च संतपीठ उभारणीसाठी येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.