Chakan : व्हॉट्सअॅप डीपीवरून एकास बेदम मारहाण ; सहा जणांवर गुन्हा दाखल;

नात्यातील मुलीचा डीपी ठेवल्याचा जाब विचारल्याने मारहाण

एमपीसी न्यूज- गावातील मुलीचा फोटो व्हॉट्सअॅपच्या डीपी वर ठेवल्यावरून आणि याचा जाब मुलीच्या नातेवाईकांनी विचारल्यावरून चाकण जवळील वाकी येथे लोखंडी गज आणि काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी सहा जणांच्या विरुद्ध जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

स्मार्टफोन वापरणाऱ्या तरूण आणि अबालवृद्धांमध्ये प्रचंड मोठी क्रेझ असलेले व्हॉट्सअॅप म्हणजे अनकांसाठी जीव की प्राण. त्यात व्हॉट्सअॅपवरचा डीपी आणि स्टेटस हा अनेकांचा ‘स्टेट’स सिंबॉल. अनेकांच्या व्यक्त होण्याची सुरूवातच डीपी आणि स्टेटसमधून होण्याचा ट्रेंड रुजत आहे. मात्र या डीपी ठेवण्यावरून तुंबळ मारामारी झाल्याची घटना घडली.

दतात्रेय नारायण जरे ( वय 35 वर्षे , रा. वाकी.बु, ता.खेड जि.पुणे ) असे मारहाण झालेल्या इसमाचे नाव आहे. तर दतात्रेय जरे यांच्या फिर्यादीवरून संदेश मारुती टोपे, संतोष मच्छींद्र टोपे, निखील बाळासाहेब गारगोटे, अंकुश संतु गारगोटे, सुरज अशोक टोपे, अजय अंकुश गारगोटे ( सर्व रा. वाकी बु, ता.खेड, जि.पुणे ) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जरे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी जरे व सचिन बबन जरे हे दोघे मोटार सायकलवरुन गारगोटे शिवीराची शाळा वाकी बु. येथून वस्तीकडे जात असताना जरे वस्तीच्या अलीकडे फिर्यादी जरे यांचा जाण्याचा रस्ता अडवून बेकायदा गर्दी जमवुन संदेश टोपे, संतोष टोपे, निखील गारगोटे, अंकुश गारगोटे, सुरज टोपे, अजय अंकुश गारगोटे यांनी संगनमत करून रस्त्यावर काठ्या टाकुन जरे यांच्या मोटार सायकलीस त्यांच्या मोटार सायकलने धडक दिली.

त्यानंतर जरे यांना ‘तू निखीलला तुझ्या नात्यातील मुलीचा फोटो व्हॉट्सअप डीपी वरून काढून टाकण्यास का सांगितले ?’ अशी विचारणा करीत संदेश टोपे याने त्याच्या हातातील गजाने व अन्य सर्वांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्यांनी फिर्यादींना जबर मारहाण केली. चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.