Pimpri: भाजपमध्ये सुंदोपसुंदी !

(गणेश यादव)

सन 2018 संपून आता लवकरच 2019 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता उलथवून भाजपने मुसंडी घेत पिंपरी- चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केली. मात्र मागील वर्षभराच्या काळात आपल्या कामामुळे भाजपचा शहरातील जनतेवर प्रभाव पडला आहे का ?,  यापूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सरस कामगिरी करीत आपल्या कार्यशैलीची चुणूक भाजपने दाखवली आहे का ? सध्या विरोधी पक्ष म्हणून असलेल्या राष्ट्रवादीला भाजपच्या कारभारावर अंकुश ठेवण्यात किती यश आले आहे ?, काँग्रेस, शिवसेना मनसे या पक्षांचे शहरातील अस्तित्व दखल घेण्याजोगे आहे का ? या सर्व बाबींवर प्रकाशझोत टाकणारी एक मालिका आजपासून सुरु करीत आहोत. त्याचा हा पहिला लेख…..

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपने उभारी घेतली आहे. त्यामुळे साहजिकच मोठेपणाबरोबर मोठी दुखणी देखील त्यांच्या पदरी पडली आहेत. एक खासदार, एक आमदार, एक संलग्न आमदार, ‘पीसीएनटीडीए’चे अध्यक्षपद, लेखा समितीचे अध्यक्षपद (राज्यमंत्री दर्जा), महापालिकेत एकहाती सत्ता आहे. निर्विवाद सत्ता, दोन-दोन मुरब्बी कारभारी असतानाही वर्षभरात सत्ताधा-यांना चमकदार कामगिरी करता आली नाही. कारभा-यांची परस्परविरोधी तोंडे, पक्षाअंतर्गत गटबाजी, आयाराम-गयाराम या वादामुळेच सरत्या वर्षात भाजप सातत्याने नकारात्मक चर्चेत राहिली. आगामी वर्ष निवडणुकांचे आहे. त्यामुळे भाजपमधील नेत्यांना जुना-नवीन वाद विसरुन एकदिलाने काम करावे लागणार आहे. अन्यथा आगामी निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या वर्षभरात सत्ताधारी भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप, स्वपक्षीयांकडून सातत्याने दिला जाणारा घरचा आहे. आयारामांना प्रभाग समितीवर संधी दिल्याचा आरोप करत भाजपच्या निष्ठावंतानी एका दिवसाचे केलेले उपोषण. खासदार अमर साबळे यांनी शहरातील राजकारणातून काढलेले लक्ष, महापौर बदल, प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची वर्णी, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांची फेरनियुक्ती, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निगडीत झालेली जंगी सभा अन्‌ आता पुन्हा निष्ठावंताची झालेली एकजूट अशा घटना सातत्याने सत्ताधारी भाजपमध्ये घडत आहेत.

जुने-नवे, आयाराम-गयाराम, भाऊ-दादा आणि निष्ठावान अशी कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे. पक्षातील पदाधिकारी एकमेकांकडे संशयाने पाहतात. त्यात भाऊ-दादांचा रिमोट कंट्रोल. त्यामुळे महापालिकेतील पदाधिका-यांना कामाची छाप पाडता आली नाही. ठसा उमटवता आला नाही. पदाधिका-यांमध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरु आहे. महापालिकेत जरी भाजपची सत्ता असली तरी शहरातील भाजपला वाकविण्याचे काम आमदारजोडी करत आहे. महापालिकेवर आमदार जोडीचे वर्चस्व आहे. वरकरणी भाजपची सत्ता दिसत असली तरी आमदार भाजपला वाकवतात. त्यामुळे महापालिकेत ‘भाजपची सत्ता नव्हे तर भाजप ‘सत्तेत’ आहे असे निष्ठावान पदाधिकारी खासगीत बोलतात.

विरोधात असताना भाजपचे पदाधिकारी परदेश दौ-याला कडाडून विरोध करत होते. दौ-याच्या विरोधात आंदोलने, पत्रकबाजी केली जात होती. परंतु, स्वत: सत्तेत येताच पदाधिका-यांच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून देश, विदेश दौ-यांचा ‘सुकाळ’ आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात सत्ताधा-यांनी तब्बल 16 दौरे केले आहेत. या दौ-यावरुन सत्ताधा-यांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाली. तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन विरोधक भाजपला टार्गेट करत आहेत. यामुळे गल्ली ते दिल्ली सत्ता असलेला भाजप शहरात बॅकफुटवर गेल्याचे दिसून येत आहे. त्यातच पक्षातील निष्ठावान आणि नवीन हा वाद वारंवार उफाळून येतच आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आणल्यास शहराला ‘लाल’ दिवा दिला जाईल, असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. गेल्या वर्षभरात शहराला मंत्रीपद मिळणार अशा सातत्याने वावड्या उडाल्या. परंतु, आजपर्यंत मंत्रीपद काही मिळाले नाही. आता मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे. मिळाले तर औटघटकेचे असेल. कारण, लोकसभेच्या निवडणुका चार महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे शहराचे कारभारी असलेल्या आमदारांमध्ये देखील नाराजीची भावना आहे.

आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आहे. शहराचे कारभारी असलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांना खासदारकीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी पाऊले टाकायला देखील सुरुवात केली असून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला आहे. त्यामुळे आमदार जोडीला नव्या वर्षात पक्षार्तंगत बंडाळी व जुन्या-नव्यांचा वाद थोपवून पालिकेच्या कारभारात सुसुत्रता आणावी लागणार आहे. अन्यथा या सगळ्याचा फटका आगामी निवडणुकीत जगताप- लांडगे या कारभारी जोडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.