Chinchwad : ‘स्वर-शब्द’ मैफिलीस रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी  न्यूज – महाकवी गदिमा आणि स्वरतीर्थ बाबूजी यांच्या जन्मशताब्दीवर्षाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरातील सुप्रसिद्ध सुगमसंगीत गुरुवर्या मंजुश्री दिवाण-वेल्हाणकर यांनी ‘स्वर-शब्द मैफल’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील घारेशास्त्री सभागृहात करण्यात आले होते.

चिंचवड येथे झालेल्याा कार्यक्रमात संगीतक्षेत्रातील विघ्नहरी देव, माधुरी कोळपे, वर्षा तेंडुलकर, लीना गुमास्ते तसेच अभिनेत्री सरोज राव यांची प्रमुख उपस्थिती होती.शब्दप्रधान गायकीचे प्रणेते आणि ज्येष्ठ संगीतकार पंडित यशवंत देव यांच्या शिष्या मंजुश्री दिवाण-वेल्हाणकर यांनी पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सुगम संगीताचा प्रसार आणि प्रचार आपल्या शिकवणीतून करायला सुरवात केली. पाच ते पंचाहत्तर वयोगटातील महिला अशा व्यापक शिष्यवर्गाला शब्दप्रधान गायकीचे संस्कार त्यांनी घडवले. या पंधरा वर्षांच्या काळात त्यांच्या काही शिष्या स्वतः संस्थाचालक झाल्यात; तर काहींनी विविध संगीत स्पर्धा, दूरदर्शन वाहिन्यांवरील रियॉलिटी शोमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.

‘स्वर-शब्द मैफली’त काही निवडक विद्यार्थिनींनी आपले गायन सादर केले. कार्यक्रमाचा प्रारंभ गीतरामायणातील “राम जन्मला…”या समूहगीताने झाला. राममय झालेल्या वातावरणाला “उठी श्रीरामा…” या विद्या चौधरीने गायलेल्या भूपाळीने प्रासादिक रंग चढवला. त्यानंतर ‘झाला महार पंढरीनाथ’ या चित्रपटातील “देव देव्हाऱ्यात नाही…” या सई ठकारने गायलेल्या भक्तिगीताने श्रोत्यांना भक्तिरसात चिंब केले. सुमती देशपांडे या बालगायिकेने “गुरुविण नाही दुजा आधार…” या गीताने चराचरातील गुरूंना अभिवादन केले. राधा येळगावकरने म्हटलेल्या “स्वर आले दुरुनी…” या गाण्याला श्रोत्यांनी समरसून दाद दिली. फक्त दहा ओळींचे “सावळाच रंग तुझा…” हे गदिमांचे गीत ऋतुजा केंचने शिवरंजनी रागातल्या आलापींसह अतिशय प्रभावीपणे सादर करून रसिकांचा ‘वन्स मोअर’ मिळवला. अपर्णा कुलकर्णीने गायलेल्या “वारा सुटे सुखाचा…” या गाण्यालादेखील रसिकांची दाद मिळाली. ‘सुवासिनी’ चित्रपटातील “ह्दयी प्रीत जागते…” या भावगीताचे श्वेता देव हिने केलेले सादरीकरण उपस्थितांना भावले. आईच्या भावनांचा उत्कट आविष्कार असलेल्या “लिंबलोण उतरू कशी…” या वरदा गुळणीकरने सादर केलेल्या रचनेने महिला श्रोत्यांच्या भावनांना हेलावून सोडले. “त्या तिथे पलीकडे…” या नितांत सुंदर गाण्याला नेहा शेटेने पुरेपूर न्याय दिला. “घननीळा… लडिवाळा…” या माणीक वर्मा यांच्या मूळ आवाजातील गीताची रंगत कौशिकी कलेढोणकरने अजिबात फिकी पडू दिली नाही. “विकत घेतला श्याम…” या राधाने सादर केलेल्या गीताला पसंतीच्या टाळया मिळाल्यात; तर ऋतुजाने “कोणीतरी बोलवा दाजीबाला…” या लावणीने पुन्हा ‘वन्स मोअर’ मिळवला. “खेड्यामधले घर कौलारू…” , “मी आज फूल झाले…”,”एकाच या जन्मी जणू…” या गीतांचे नेटके सादरीकरण झाले. पाच रागांवर आधारित “जिवलगा, कधी रे येशील तू…” हे अवघड गीत अपर्णा कुलकर्णीने तन्मयतेने सादर केले. मंजुश्री दिवाण यांची शिष्या असलेल्या आणि आता स्वतःची संस्था स्थापन करून विद्यार्थी घडवणाऱ्या शर्मिला शिंदे यांनी “आज कुणीतरी यावे…”आणि “थकले रे नंदलाला…” या गीतांचे प्रगल्भतेने सादरीकरण केले. उत्तरोत्तर अतिशय रंगतदार झालेल्या या मैफलीची सांगता “शंभो शंकरा…” या नेहाच्या भक्तिगीताने झाली.

प्रणव कुलकर्णी (सिंथेसायझर), कुमार करंदीकर (संवादिनी), ऊर्मिला भालेराव (तालवाद्य), संतोष साळवे (तबला) आणि अनुपम कामत (गिटार) यांनी साथसंगत केली. मूळ गाण्याचे किस्से, प्रसंग आणि विविध संदर्भ उद्धृत करीत अश्विनी पुणतांबेकर यांनी अतिशय बहारदार सूत्रसंचालन केले.”उमेश ठकार, अपर्णा ठकार, मंगेश येळगावकर, वैशाली येळगावकर, शीतल कापशीकर यांनी संयोजनात सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.