Ravet : बंधा-यात आढळले दोन मोठे खडक ; खडक फोडून बंधा-याची उंची वाढविल्यास 510 एमएलडी पाणीसाठा वाढणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या रावेत बंधा-याची उंची वाढविण्यासाठी पवना नदीपात्राचे ड्रोनद्वारे 8 किलोमीटर सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात नदीपात्रात दोन ठिकाणी मोठ्या उंचीचे खडक आढळले आहेत.

खडक फोडून अर्धा मीटरने बंधा-याची उंची वाढविल्यास 250 एमएलडी तर एक मीटर उंची वाढविल्यास पाणी साठवण क्षमतेमध्ये 510 एमएलडीची वाढ होणार आहे. पंप हाऊसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास या उपलब्ध पाणीसाठ्यातून शहराची दोन दिवसांची तहान भागविणे शक्‍य होणार आहे. पवना नदीवरील रावेत येथील बंधारा तत्कालीन लोकसंख्येनुसार पाणी वापर तसेच भविष्यात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन बांधण्यात आला होता. हा बंधारा 50 वर्षे जुना झाला आहे. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकात महापालिका हद्दीत प्रचंड गतीने विकास होत आहे. लोकसंख्या वाढ कमी कालावधीत प्रमाणापेक्षा अधिक झाले आहे. रावेत बंधा-याजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. सद्यस्थितीत रावेत येथील बंधा-यातून महापालिका 480 एमएलडी, एमआयडीसी 120 एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 30 एमएलडी जलउपसा करते.

रावेत येथील बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या बंधा-याची देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येतात. हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने सद्यस्थितीत येथे पाणी साठवणूक क्षमता जलउपसाच्या अनुषंगाने कमी असल्याचे पाटंबधारे विभागाच्या अधिका-यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. त्यानंतर महापालिकेने ड्रोनद्वारे केलेल्या आठ किलोमीटरच्या सर्वेक्षणात नदीपात्रात दोन ठिकाणी मोठ्या उंचीचे खडक आढळले आहेत. जॅकवेलपासून अनुक्रमे चार आणि 26 मीटर अंतरावर खडक आढळले आहेत.

या सर्व्हेक्षणात बंधा-याची उंची वाढविणे, खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने बंधा-याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्‍याची पाण्याची पातळी तपासणे आवश्‍यक आहे. हे काम तातडीने करणे आवश्‍यक असल्याने पाटबंधारे विभागामार्फत ड्रोन सर्व्हेक्षण करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणात या बंधा-याची उंची वाढविण्याचे दोन प्रस्ताव विचारधीन आहेत. अर्धा मीटरने बंधा-याची उंची वाढविल्यास बंधा-याची पाणीसाठवण क्षमता 250 एमएलडीने वाढणार आहे. तर, एक मीटरने उंच वाढविल्यास, दुपटीने म्हणजेच 510 एमएलडी पाणी साठवणूक क्षमता वाढणार आहे. हे सर्वेक्षण जलसंपदा विभागाला सादर केल्यानंतर महापालिका व जलसंपदा विभागाच्या अधिका-यांच्या उपस्थित बंधा-याची संयुक्त पाहणी केली जाणार आहे. त्यादरम्यान 50 वर्षे जुना असलेल्या या बंधा-याची स्थिरता तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार अर्धा की एक मीटर उंची वाढविणे योग्य ठरणार आहे, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

या सर्वेक्षणात अर्धा आणि एक मीटर उंची वाढविल्यास रावेत बंधा-यापासून 8 किलोमीटरपर्यंत पाण्याची उंची किती असू शकेल, याची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये पूरनियंत्रण रेषेचादेखील अभ्यास करण्यात आला. त्यानुसार पूरनियंत्रणरेषेनुसार 565 डॅम टॉप उंची असणार आहे. तर एक मीटरने बंधा-याची उंची वाढविल्यास पाण्याची पातळी 562.7 एवढी उंची असणार आहे. याशिवाय सध्या पवना बंधा-याची लांबी 200 मीटर असून, उंची वाढविल्यास या बंधा-याची लांबी 30 मीटरने वाढविली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.