Lonavala : सार्वजनिक बांधकाम विभागाने वलवण गावातील रस्त्याची लावली वाट

नूतनीकरणाच्या नावाखाली केवळ खडी व डांबर पाण्याचा मारा

एमपीसी न्यूज- सरकारी कामातील अनागोंदीपणा पहायचा असेल तर तो सार्वजनिक बांधकाम विभागात प्रखरतेने पहायला मिळतो. मागील पंधरा दिवसापूर्वी वलवण गावातून जाणार्‍या जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. प्रत्यक्षात मात्र रस्ता डांबरीकरण करण्याऐवजी केवळ मोठी खडी रस्त्यावर टाकत त्यावर डांबराचे पाणी टाकून नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. 

डिसेंबर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) वलवण गावातून जाणारा रस्ता मनशक्ती केंद्र ते द्रुतगती पुलाच्या दरम्यान बनविण्याचे काम हाती घेतले होते. अवघ्या तीन दिवसात सर्व नियम पायदळी तुडवतपूर्वीच्या डांबरी रस्त्यावर मोठी खडी पसरून त्यावर डांबर पाणी मारले व काम संपवले. यामुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी मोठी गैरसोय झाली आहे.

अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावर वाहने सरकून पडल्याने जखमी झाले आहेत. ठेकेदाराने रुपयाचे काम चार आण्यात उरकून कामात मोठा घोटाळा केला असल्याची चर्चा आहे. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. ठेकेदाराच्या या निकृष्ट कामामुळे नागरिक आता नगराध्यक्षा व मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नावाने खडे फोडू लागले आहेत. लोकप्रतिनिधीनी याची तातडीने दखल घेत ठेकेदारावर कारवाई करत त्याला काळी यादीत टाकावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याकामाबाबत तक्रार देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना फोन केले असता त्यांनी साधा फोन उचलण्याची तसदी देखील घेतली नसल्याने ही सारी मिलीभगत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.