Raigad : व्हायब्रण्ट एच. आर. संस्थेतर्फे रायगड जिल्ह्यातील शाळेचे संपूर्ण संगणकीकरण

एमपीसी न्यूज – व्हायब्रण्ट एच. आर. संस्थेच्या वतीने रायगड येथे सलग चौथ्या वर्षी सामाजिक बांधिलकीतून शाळेचे संगणकीकरण आणि रायगड प्लास्टिक मुक्ती अभियान राबविण्यात आले.

व्हायब्रण्ट एच. आर. ही मानवी संसाधन विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची संस्था असून या संस्थेमार्फत गेली चार वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याचाच भाग म्हणून या संस्थेने रायगड पायथ्याला असणारी जिल्हा परिषद शाळा दत्तक घेतली असून शाळेसाठी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यामध्ये शाळकरी मुलांना शालेय, क्रीडा, विज्ञान, गणवेश, उबदार कपडे, रेनकोट आदी साहित्याचे वाटप केले जाते.

संगणकीकरणाच्या युगात ही शाळा आणि तिथला विद्यार्थी मागे राहता कामा नये व त्यांना यात पारंगत होण्याची संधी मिळावी या हेतूने व्हायब्रण्ट एच. आर. यांच्या वतीने या वर्षी या शाळेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले. शाळेसाठी दोन संगणक दोन प्रोजेक्‍टर, प्रोजेक्‍टर स्क्रिन आणि म्युझिक सिस्टीमचा पूर्ण संच देऊन शाळेचे संपूर्ण संगणकीकरण सोहळा मोठ्या दिमाखदार स्वरूपात पार पडला. या उपक्रमात कमिन्स इंडिया, महाड इंडस्ट्रियल असोसिएशन, रॉस लाईफ सायन्स, प्रशांत इंगवले आदींनी मदतीचा हात दिला.

प्लास्टिक मुक्त रायगड या मोहिमेअंतर्गत गडावरून 78 पोती प्लास्टिकचा कचरा जमा करण्यात आला आणि तो पुरातत्व विभागास पुढील विल्हेवाट करण्यासाठी सुपूर्त करण्यात आला. या मोहिमेत शंभरहून अधिक सभासदांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. विनोद बाबर यांचे यशाचा शिवमंत्र या विषयावर व्याख्यान झाले. शिवशाहीर गणेश ताम्हाणे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी केले. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. अनिल उबाळे, दीपक खोत, शीतल साळुंके, गौरी, गजानन डाफे, मिलिंद पोरे, संग्राम पाटील, रविराज शिंदे यांनी संयोजन केले. संपत पारधी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.