Pune : 17 व्या पुणे फिल्म फेस्टिव्हलला (पिफ) गुरुवारपासून पुण्यात सुरुवात

गोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर आणि रामलक्ष्मण यांचा 'पिफ'अंतर्गत विशेष सन्मान

एमपीसी न्यूज- ‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणा-या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला पुण्यात गुरूवारी (दि. 10) पासून सुरुवात होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता कोथरूड सिटीप्राईड चित्रपटगृहात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी दिग्दर्शक गोविंद निहलानी, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच संगीतकार रामलक्ष्मण यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

याबाबतची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी(दि. 7) पत्रकार परिषदेत केली.  महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटन समारंभास राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमानंतर चिलीचा ‘डॅम किड्स’ हा गोन्जालो जस्टिनिअॅनो दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून दाखविला जाईल, अशी माहितीही डॉ. पटेल यांनी यावेळी दिली.

हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री तबू हिची यंदाच्या ‘पिफ’मध्ये खास उपस्थिती असणार आहे. महोत्सवाच्या दुस-या दिवशी तबू ‘अंधाधुन’ या आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी सिटीप्राईड कोथरूड येथे उपस्थित राहणार आहे, तर 12 जानेवारीला ‘अंधाधुन’चे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्यासह तबू सिटीप्राईड कोथरूड चित्रपटगृहाच्या मागील बाजूस भरवल्या जाणा-या ‘फिफ फोरम’ला भेट देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.