Nigdi : भरधाव रिक्षाची नॅनोला धडक; वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने नॅनो कारला धडक दिली. त्यामुळे नॅनो कार डिव्हायडरला धडकली. या अपघातात कारमधील जखमी झालेल्या वृद्ध चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात प्राधिकरण निगडी येथील भेळ चौकात 2 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास झाला.

विनय शंकर काळोखे (वय 60, रा. सेक्टर नं 26, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालिदास काळोखे (वय 63) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कालिदास हे 2 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास नॅनो कार घेऊन भेळ चौकातून जात होते. त्यावेळी एक रिक्षाचालक भरधाव वेगात आला. त्याने कालिदास यांच्या कारला धडक दिली. यामुळे कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात कालिदास यांच्या हनुवटी व छातीला मार लागला. त्यातच ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी अज्ञात रिक्षाचालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. कालिदास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.