BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : सापडलेले 50 हजाराचे मंगळसूत्र प्रामाणिक युवकाने केले परत

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- आजकाल जगामध्ये प्रामाणिकपणाची भावना नष्ट होत चालली आहे अशी खंत अनेकदा बोलून दाखवली जाते. या भावनेला छेद देणारे प्रसंग घडतात आणि लोकांमध्ये इमानदारी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय येतो. अशीच एक घटना निगडी प्राधिकरण येथे घडली. एका महिलेचे हरवलेले 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र एका युवकाला सापडल्यानंतर त्याने ते प्रामाणिकपणे परत करून जगामध्ये प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचा अनुभव दिला.

निगडी प्राधिकरण सेक्टर 27 मध्ये राहणारे सुनील मडकीकर आणि शैला मडकीकर हे तीन दिवसांपूर्वी प्राधिकरणात असलेल्या ठाकूर यांच्या यांच्या शिव स्वादिष्ट भेळ या भेळपुरीच्या दुकानात गेले होते. भेळ खात असताना शैला मडकीकर यांच्या गळ्यातील 15-18 ग्रॅम वजनाचे अंदाजे 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र त्यांच्या नकळतपणे गळून पडले. ते बसले होते त्या स्टुलाखाली ते पडले. भेळ खाऊन झाल्यावर मडकीकर दांपत्य घरी परतले. घरी आल्यानंतर मंगळसूत्र हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घरी आणि आसपासच्या परिसरात बराच शोध घेतला. पण ते सापडले नाही.

दरम्यान, मडकीकर दांपत्य भेळ खाऊन निघून गेल्यानंतर त्याठिकाणी सिद्धार्थ जोशी एक नावाचा युवक भेळ खाण्यासाठी आला असता त्याच्या नजरेला स्टुलाखाली पडलेले मंगळसूत्र दिसून आले. त्याने ते प्रामाणिकपणे दुकानाचे मालक ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. दुसऱ्या दिवशी मडकीकर यांनी ठाकूर यांच्या दुकानात मंगळसूत्र पडले असावे असा विचार करून ते दुकानात गेले असता ठाकूर यांनी सदरचे मंगळसूत्र मडकीकर यांना परत केले. शिवाय ज्या तरुणाने ते परत केले त्या सिद्धार्थ जोशी याचा मोबाइल क्रमांक देखील दिला. मडकीकर यांनी ठाकूर यांचे आभार मानून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

त्यानंतर मडकीकर यांनी सिद्धार्थ जोशी याला फोन करून घरी बोलावून त्याचा देखील सन्मान केला. त्याचे आभार मानले.  त्याचप्रमाणे त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून रोख रक्कम दिली. मूळचा मालवण येथील सिद्धार्थ जोशी हा मेकॅनिकल डिप्लोमा केलेला युवक असून तो सध्या आकुर्डीच्या बजाज ऑटो कंपनीत नोकरी करतो. त्याच्या घरची बेताची परिस्थिती असून त्याच्या वडिलांनी इस्त्रीचे दुकान चालवून मोठ्या कष्टाने सिद्धार्थच्या शिक्षणासाठी खर्च केला. सध्या सिद्धार्थ एका कुटुंबामध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहतो.

आजकाल लोकांमध्ये दुसऱ्याचे ते देखील आपले समजून ते लाटण्याची मानसिकता निर्माण होत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये सिद्धार्थ जोशी सारखे तरुण आपल्या प्रामाणिकपणातून या मानसिकतेला खोटे ठरवतात. त्यामुळे जगामध्ये अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक आहे याचा प्रत्यय येतो.

HB_POST_END_FTR-A4

.