वृत्तपत्रविक्रेत्या राजूला मिळाली तब्बल 8296 मते

वृत्तपत्रविक्रेता बनला नगरसेवक

एमपीसी न्यूज – लोकल ट्रेनमध्ये पेपरविक्री करुन, पेंटीगची कामे तसेच मिळेल ती मोलमजुरीची कामे करुन स्वतःच्या   कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणारा झोपडपट्टीत राहणारा कष्टकरी तरुण आपल्या अथक परिश्रम, अचाट जिद्द व चिकाटीच्या जोरावर आज नगरसेवक झाला आहे. ही किमया साध्य केली आहे दापोडीतील सोपान जाधव चाळ, सिद्धार्थ नगर, झोपडपट्टीत राहणारा राजु विश्वनाथ बनसोडे या तरुणाने.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30, अनुसूचित जाती या जागेमधून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या वतीने बनसोडे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना 8296 मतांची मजल मारुन विजय संपादन केला. या निवडणुकीत बनसोडे यांनी भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष, युतीच्या बलाढ्य अशा उमेदवार ज्या सलग पाच वेळा  या भागातून निवडून येऊन या भागाचे नेतृत्व करित होते, अशा उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांना 7 हजार 502 मते मिळाली. तब्बल 794 मतांचा पराभव करीत राजू बनसोडे यांनी यश मिळविले.त्यांनी या भागाची धुरा संभाळली. या चकित करणाऱ्या निकालाची सर्वांनीच दखल घेत बनसोडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. या पुर्वी बनसोडे यांनी 2007च्या महापालिका निवडणुकीत सोनकांबळे यांना कडवी लढत देत केवळ शंभर मतांनी त्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

बनसोडे यांची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून हलाखीची होती. एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत बनसोडे यांची आई पार्वती, वडील विश्वनाथ, व तीन भाऊ व एक बहीण  यांच्या  समवेत  राहत  होते. ते घरात सर्वात लहान होते. वडील विश्वनाथ चप्पलच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करायचे तर आई पार्वती या शनिवारवाड्या  समोर बसून चप्पल विक्री करुन पतीस आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करित असे. घरची परिस्थिती अंत्यंत बिकट असल्याने बनसोडे यांनी पाचवी नंतर पुढे शिक्षण न घेता मिळेल त्या मोलमजुरीच्या कामाद्वारे आईवडीलांना आर्थिक मदतीचा हातभार लावला. रेल्वे ट्रेन मध्ये पेपर विकणे, रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामे करणे, पेंटिगची कामे करणे अशा प्रकारे मिळेल ती मोलमजुरीची कामे करुन ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी प्रयत्न करीत असे.


  
लहानपणापासून बनसोडे यांना समाजसेवेची आवड होती त्याद्वारे मंडळाच्या माध्यमातून विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमे राबवित असे. कालांतराने राष्ट्रवादी पक्षाशी त्यांचा संपर्क जोडला गेला. येथील मातब्बर नेत्याच्या संपर्कात राहुन बनसोडे यांनी राजकीय धडे गिरविले बनसोडे यांची जिद्द, चिकाटी व काम करण्याची एकाग्रता पाहून पक्षाने त्यांना प्रथमच 2007 च्या महापालिका निवडणुकीत संधी दिली. या निवडणुकीत आरपीआयच्या सोनकांबळे यांना कडवी लढत देत अवघ्या शंभर मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. पक्षाने त्यांच्या या कडव्या लढतीचे कौतुक केले. व पुन्हा त्यांना यंदाच्या निवडणुकीत संधी दिली. बनसोडे यांनी पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करीत तसेच त्यांचा विश्वास सार्थ ठरवित भाजप आरपीआय युतीच्या चंन्द्रकांता सोनकांबळे यांचा आश्चर्यरित्या पराभव केला. आणि आपल्या आईवडीलांचे काही तरी बनण्याचे स्वप्न अखेर अशाप्रकारे पुर्ण केले. आमच्या कष्टाचे चिज झाले असल्याची प्रतिक्रीया या वेळी डोळ्यातुन आनंद अश्रू वाहत बनसोडेंची आई पार्वतीबाई व वडील विश्वनाथ यांनी व्यक्त केली. आगामी काळात या भागातील पाणी प्रश्न, गोरगरीबांसाठी स्थानिक रुग्णालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, पुरेसे सार्वजनिक शौचालाये ,मुलांसाठी उद्यान आदी विकासकामे करणार असल्याचा निर्धार बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.