Pune : ‘लायन्स् प्रौढ लीग अजिंक्यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेत कोकणे स्टार्स संघाला विजेतेपद

एमपीसी न्यूज- लायन्स् क्लब डिस्ट्रीक 323 डी-2 तर्फे आयोजित ‘लायन्स् प्रौढ लीग अजिंक्यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेत राजेंद्र शिंदे याच्या खेळीच्या जोरावर कोकणे स्टार्स संघाने प्राधिकरण ब्लास्टर्स संघाचा १७ धावांनी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

नेहरू स्टेडियमवर मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोकणे स्टार्स आणि प्राधिकरण ब्लास्टर्स हे दोन संघ दाखल झाले होते. या दोन संघांनी साखळी सामन्यात एकही सामना गमावला नव्हता. कोकणे स्टार्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 150 धावा केल्या. राजेंद्र शिंदे याने 2 चौकार आणि 4 षटकारांसह 40 ठोकल्या. यासह अनंत देशमुख (27) आणि सुनील मदन (नाबाद 18) यांनी उपयुक्त धावा जमवून संघाला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला.

या आव्हानाचा पाठलाग करताना प्राधिकरण ब्लास्टर्सने सावध सुरूवात केली. पण धावगती वाढविण्याच्या प्रयत्नात त्यांचे फलंदाज बाद झाले. प्राधिकरण संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 133 धावा केल्या. श्रीनिवास सरोदे (42 धावा), भुपेंद्र सिंग धुल्लट (18), सुशील मुथीयन (17) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण डिस्ट्रीक गव्हर्नर 3234 डी-2चे रमेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या डिस्ट्रीक क्रिकेटचे मुख्य वसंतभाऊ कोकणे आणि भुपेंदरसिंग धुल्लट आदि मान्यवर उपस्थित होते. विजेत्या आणि उपविजेत्या संघाला करंडक देण्यात आला.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान निलेश नातू (138 धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाज विनय निंबाळकर (7 विकेट), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक राजेंद्र शिंदे आणि मालिकावीर हा किताब विजय कुतवळ (109 धावा आणि 5 विकेट) देण्यात आला. स्पर्धेतील फेअर प्लेचा पुरस्कार नवले ऑक्सीकेअर या संघाला देण्यात आला.

स्पर्धेतील अंतिम सामन्याचा निकाल

कोकणे स्टार्सः 20 षटकात 5 गडी बाद 150 धावा (राजेंद्र शिंदे 40 (23, 2 चौकार, 4 षटकार), अनंत देशमुख 27, सुनील मदन नाबाद 18, ज्ञानेश्‍वर धुमाळ 2-23, शैलेश बुरसे 2-18) वि.वि. प्राधिकरण ब्लास्टर्सः 20 षटकात 7 गडी बाद 133 धावा (श्रीनिवास सरोदे 42 (33.3 चौकार, 2 षटकार), भुपेंद्र सिंग धुल्लट 18, सुशिल मुथीयन 17, सुनिल मदन 2-29, आनंद पाटील 2-18); सामनावीरः राजेंद्र शिंदे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like