Pimpri : पार्थ पवार कोण आहेत हे लोकसभेला दाखवून देऊ – संतोष मु-हे

राजकारणात येऊ पाहणा-या तरुणांवर टीका करणे अयोग्य

एमपीसी न्यूज – देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तीन पिढ्या राज्याच्या राजकारणात असून देशाच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्या पवार घराण्यातील एका सदस्याला ओळखत नाही अशी खासदार श्रीरंग बारणे यांनी टीका करणे योग्य नाही. पार्थ पवार कोण आहेत, हे तुम्हाला माहीत नसतील तर आगामी लोकसभा निवडणुकीत ते दाखवून देऊ, असा इशारा पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष मु-हे यांनी दिला. तसेच खासदार बारणे यांनी हे विधान मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार हे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे मतदार संघात दौरे वाढले आहेत. शहरात त्यांचे स्वतंत्र फलक देखील झळकले होते. याबाबत पत्रकारांनी गुरुवारी (दि.9) खासदार श्रीरंग बारणे यांना विचारले असता त्यांनी कोण पार्थ पवार, आपण ओळखत नाही. कोणी फलकबाजी करून नेता होत नाही, अशी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष मु-हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी अॅड. जगन्नाथ गोपाळे, दिलीप राक्षे उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना संतोष मु-हे म्हणाले, “खासदार बारणे त्यांच्या 25 वर्षांचा अनुभव आणि विकास याबाद्दल बोलत आहेत. तर, ज्या घराणाच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत. त्या पवार घराण्यातील एका सदस्यावर अशी टीका करणे योग्य नाही. राजकारणात नव्याने येऊ पाहणा-या तरुणांवर खासदार बारणे यांच्यासारख्या अनुभवी राजकारण्यांनी अशी टीका करणे चुकीचे आहे. त्यांना पार्थ पवार कोण आहेत हे माहीत नसतील तर आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत दाखवून देऊ”

महाराष्ट्र राज्य प्रगल्भ आणि पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेले राज्य आहे. या राज्याने यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार असे संपूर्ण देशावर ज्यांच्या विचारांचे गारुड असलेले नेते दिले. अशा विचारवंताच्या महाराष्ट्रात नव्याने राजकारणात येऊ पाहणा-यांवर अशा प्रकारच्या टीका करणे योग्य नाही. खासदार बारणे यांनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी मु-हे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.