लग्नानंतर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे हे सोपे नाही – नम्रता दुबे

एमपीसी न्यूज- लग्नानंतर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे हे सोपे नाही. माझे ध्येय साध्य करताना मी हजारो वेळा पडले असेन, पण मी पडले तरी मी प्रयत्न करणे सोडू का ? कधीच नाही. मी हजारो वेळा पडले तर तितक्याच वेळा परत उठेन आणि सांगेन की हा शेवट नाही, असे आश्वासक मत सुप्रसिद्ध मॉडेल आणि महिला सबलीकरणााठी काम करणा-या नम्रता दुबे यांनी व्यक्त केले. मॉडेलिंग क्षेत्रातील एक आश्वासक आणि प्रथितयश महिला ही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करताना अनेक अडचणी आल्या. पण त्यांच्यावर नम्रता यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक मात केली.

गेली काही वर्षे पुण्यात राहणा-या नम्रता दुबे यांनी मॉडेलिंगच्या क्षेत्रात अनेक मानाचे किताब पटकावले आहेत. मिस डेहराडून सेकंड रनर अप, मोस्ट ब्युटिफुल मॉम 2008, मिसेस महाराष्ट्र ग्लॅमरस 2017, मिसेस वेस्ट इंडिया 2018, मिसेस स्टाइल आयकॉन 2018, मिसेस बेस्ट कॉश्चुम 2018 असे एकाहून एक सरस किताब त्यांनी आपल्या शिरपेचात खोवले आहेत. आपल्या या नेत्रदीपक वाटचालीबद्दल बोलताना नम्रता म्हणाल्या की, माझ्या कारकीर्दीचे लग्नापूर्वी आणि लग्नानंतर असे दोन मुख्य भाग करता येतील. लग्नापूर्वी मला फॅशन इंडस्ट्रीत विशेष रस होता. त्यामुळे मी तेव्हा मिस डून या डेहराडूनच्या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता. त्यात मी रनर अप ठरले. नंतर माझी मॉडेलिंगची करियर सुरु झाली. तो फ्युजी फिल्मचा जमाना होता. त्यावेळी मी एकावेळी 86  कॅमे-यांना सामोरे जाणाचा एक अनोखा अनुभव घेतला. नंतर माझे लग्न झाले. आपल्या समाजात मुलींना अपरिहार्यपणे लग्न करावे लागते. त्याचप्रमाणे माझे देखील लग्न झाले. पण नंतर माझे करियर बंद झाले. कारण माझ्या सासरच्यांकडून मला तितकेसे प्रोत्साहन मिळाले नाही. पण मी हार मानली नाही. योग्य संधी मिळण्याची वाट पाहिली. नंतर माझ्या मुलांच्या जन्मानंतर मी कुटुंबाच्या साथीने नव्याने या क्षेत्रात पुन्हा पाऊल ठेवले.

या सर्व वाटचालीत मी हिंमत कधीही सोडली नाही. माझ्या अनुभवांमधून मला बरेच काही शिकायला मिळाले. पुढे एका सौंदर्यस्पर्धेची मला माहिती मिळाली आणि वाटले पुनरागमन करण्याची हीच योग्य वेळ आहे, हाच तो प्लॅटफॉर्म आहे. मी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि 2017 साली मिसेस महाराष्ट्र ग्लॅमरस ठरले. नंतर मग मात्र मी मागे वळून बघितलेच नाही. या सर्व वाटचालीत मला माझ्या मुलांनी खूप मानसिक बळ दिले, पाठिंबा दिला. माझी ही वाटचाल खूप खडतर होती. कारण लग्नानंतर सुमारे 12-15 वर्षांची गॅप पडली होती. पण मला वाटते स्त्री जात्याच सहनशील आणि खंबीर असते. तिच्या मनात जी इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी ती खूप परिश्रम करते. माझेपण हेच झाले. मनातील जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर मी आजवरची वाटचाल करु शकले. काहीतरी करुन दाखवण्याच्या इच्छेमुळेच माझ्याकडे आज चांगलेचांगले प्रोजेक्ट आहेत. अभिनयाच्या क्षेत्रातदेखी मी आता पाऊल ठेवत आहे. मॉडेलिंगमध्ये करियर केलेले असले तरी मला पहिल्यापासून अभिनयामध्ये रुची होती. पण मी त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नव्हते. पण नंतर क्रॅस कोर्स करुन मी अभिनयाकडे देखील वळले आहे. पुढे जाऊन याक्षेत्रात व्यवसायात उतरण्याचा देखील माझा मानस आहे.

हुशारी आणि सुंदर चेह-या बरोबरच तुमच्याजवळ जबरदस्त आत्मविश्वास असणेदेखील तितकेच जरुरी आहे. जरी तुम्ही सुंदर आहात पण समयसूचकता नसेल तर तुम्ही योग्य उत्तरे देऊ शकणार नाही. सध्या आपल्या देशातील महिला अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत. ती फॅशन इंडस्ट्री असेल किंवा राजकारण असेल. लोकांची विचारसरणी हळूहळू बदलत आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महिलांना विविध क्षेत्रात पुढे येण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. त्यामुळे महिला सुशिक्षित होत आहेत आणि स्वतच्या पायावर उभ्या राहू शकत आहेत.

एक सुशिक्षित स्त्री असल्यामुळे मी माझी मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर इथपर्यंत येऊन पोचले आहे. या क्षेत्रात गैरव्यवहार देखील आहेत. इथे ब-याचवेळा जसं दिसतं तसं असत नाही, तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. पण मला वाटतं की सरकारने याकडे लक्ष देऊन महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करायला हवे. जेणेकरुन चुकीच्या गोष्टींना पायबंद बसेल. मला जर राजकारण आणि बॉलिवूड यात निवडायला सांगितले तर महिलांच्या बाबतील होणा-या हिंसेला रोखणे हे मी माझे पहिले कर्तव्य समजेन आणि महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला मला जास्त आवडेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.