Pimpri : अकरा वर्षाच्या शाश्वत शिंदे याचा सायकल चालविण्याचा जागतिक विश्वविक्रम

सलग दहा तास चालविली सायकल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील शाश्वत चंद्रशेखर शिंदे या अकरा वर्षे वयाच्या बालकाने सलग दहा तास दहा मिनिटे दहा सेकंद सायकल चालवून जागतिक विश्वविक्रमात नोंद केली आहे. 27 जानेवारी रोजी बालेवाडी क्रीडा संकुल येथे सकाळी सहा वाजता शाश्वत याने या विश्वविक्रमाची सुरुवात केली. शाश्वतच्या या विश्वविक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् (लंडन, युके) मध्ये करण्यात आली आहे.

बालेवाडी क्रीडा संकुल येथे सायंकाळी चार वाजता शाश्वत याने हा दहा तास दहा मिनिटे व दहा सेकंदाचा विश्वविक्रम पूर्ण केला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या विश्वविक्रमाचा गौरव केला. शाश्वत याने हा विक्रम पूर्ण केल्यानंतर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् चेअरमन डॉ. दिवाकर सुकूल (लंडन) व ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य वीरेंद्र शर्मा (लंडन) आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् चे प्रेसिडेंट अॅड. संतोष शुक्ला (सुप्रीम कोर्ट) यांनी दूरध्वनीवरून त्याचे अभिनंदन केले.

हा विश्वविक्रम पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर योगेश बहल, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्‌चे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. आनंद भावसार, विजय तुंगार, अमोल ताकवडे यांच्या हस्ते शाश्वत शिंदे याला प्रशस्तीपत्र प्रदान करून त्याचा गौरव केला.

शाश्वत चंद्रशेखर शिंदे याचा जन्म 24 जून 2007 चा असून तो एस. एन. बी. पी. इंटरनॅशनल स्कूल मोरवाडी येथे सहावी इयत्तेत शिकत आहे. सायकलिंग मध्ये विश्वविक्रम करण्याचा त्याचा लहानपणापासूनच मानस होता. शाश्वत याचे वडील चंद्रशेखर शिंदे हे मुंबई व पुणे शहरातील विख्यात आर्किटेक्ट कंपनीचे बिजनेस हेड आहेत. तर, त्याची आई मनीषा चंद्रशेखर शिंदे या ऑल इंडिया आय टी असोसिएशन या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या जॉईंट सेक्रेटरी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.