Chikhali : ‘दुचाकी वेळेत आणून का दिली नाही’ असे विचारल्यावरून एकावर वार

एमपीसी न्यूज – ओळखीच्या तरुणाला काही कामासाठी दुचाकी दिली. ती त्याने वेळेत आणून दिली नाही. दुचाकी वेळेत का आणून दिली नाही? अशी विचारणा करणा-या दुचाकीच्या मालकावर तिघांनी मिळून कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 3) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरकुल चिखली येथे घडली.

दत्तात्रय बालाजी महाजन (वय 17, हरगुडे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आतिष शरद चव्हाण (रा. घरकुल, चिखली) आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय आणि आरोपी आतिष हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी आतिष याने दत्तात्रय यांची दुचाकी त्याच्या कामासाठी नेली. ती दिलेल्या वेळेत परत आणून दिली नाही. म्हणून दत्तात्रय यांनी आरोपीला दुचाकी वेळेत का आणून दिली नाही याबाबत विचारणा केली.

यावरून आरोपीने चिडून दत्तात्रय यांना लोखंडी कोयत्याने उजव्या खांद्यावर मारले. यामध्ये दत्तात्रय गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून दत्तात्रय आणि त्यांच्या मित्राला पकडून हाताने मारहाण करून परिसरात दहशत पसरवली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.