Pune : वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचा 20 फेब्रुवारीला मंत्रालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज- महानिर्निती, महापारेषण व महावितरण मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे 25 हजार कंत्राटी कामगार काम करतात. या कामगारांवर कंत्राटदाराकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी तसेच पूर्वीची रोजंदारी पद्धत राबवावी या मागणीसाठी कंत्राटी कामगार येत्या 20 फेब्रुवारी रोजी पुण्याहून मुंबईत चालत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी पुण्यात मंगळवारी (दि. 5) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या निदर्शनाच्या सभेत सांगितले.

महानिर्निती, महापारेषण व महावितरण मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे २५ हजार कंत्राटी कामगार काम करतात. या कामगारांवर कंत्राटदाराकडून अन्याय केला जातो. या कामगारांना केवळ कागदोपत्री किमान वेतन दिले जाते. प्रत्यक्षात या कामगारांच्या हातात किमान वेतन मिळत नाही. या अन्यायाविरुद्ध तक्रार करणाऱ्या कामगाराला कामापासून वंचित ठेवले जाते. या कामगारांना भविष्यनिर्वाह निधी, ईएसआय, ग्रॅज्युइटी, बोनसच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे केले जातात.

या प्रश्नांबाबत अनेक वेळा ऊर्जामंत्री, कामगार आयुक्त कार्यालय, व्यवस्थापन यांच्याकडे दाद मागितली. मात्र अद्याप या सर्व मागण्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांसाठी कंपनी जवळच घरकुल योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अद्याप त्याची देखील पूर्तता झालेली नाही. कंत्राटी कामगारांचे किमान वेतन 22 हजार रुपये करण्यात यावे व मागील सर्व फरकांसह ही रक्कम देण्यात यावी अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केली आहे.

या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलेल्या निदर्शनानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार हेमंत निकम यांनी मागण्यांचे स्वीकारले. या शिष्टमंडळात संघटनेकडून अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश अणेराव, अर्जुन चव्हाण, सागर पवार, प्रवीण पवार, सुमित कांबळे यांचा सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.