Sangvi : सांगवीतील ऋतुजा जोगदंड हिची राष्ट्रीय नेटबॉल संघात निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथे राहणाऱ्या कु.ऋतुजा जोगदंड हिची राष्ट्रीय नेटबॉल संघात निवड झाली आहे. ऋतुजा ही मॉडर्न महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने पुणे जिल्हास्तरीय स्पर्धा खेळली होती. त्यानंतर तिची नगर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेतही तिची निवड झाली होती. या स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीमुळे तिच्या निवडीचे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले.

महाराष्ट्रातील नाशिक, येवला, राजगुरूनगर, पुणे, अकोले, पिंपरी चिंचवड, अशा विविध महाविद्यालयातील प्राचार्यांना पत्रे देण्यात आली. यावेळी राज्यातील विविध महाविद्यालयातून १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे या महाविद्यालयाची कु. विशाखा पलांडे या विद्यार्थिनींची देखील या संघात निवड झाली आहे.

फेब्रुवारीत चेन्नईत दि. २५ ते २८ होणाऱ्या स्पर्धेत देशपातळीवर ऋतुजा जोगदंड खेळणार आहे. कोणत्याही प्रकारचे घरामध्ये क्रीडा वातावरण नसताना तिची निवड झाल्याने प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, तिचे वडील मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड व राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर यांनी तिचे कौतुक केले. तिला क्रीडा शिक्षक विक्रम फाले यांचे मार्गदर्शन मिळाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे तिचे स्वप्नं असल्याचे तिने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.