Pimpri : मेट्रोच्या कामासाठी चौकातील सिग्नल बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावर हे काम सुरु असून महत्वाच्या चौकांदरम्यान काम करताना चौकातील सिग्नल बंद ठेवण्यात येत आहेत. सध्या मोरवाडी येथील अहिल्याबाई होळकर चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिग्नल बंद ठेवण्यात आला आहे. पुढील दोन आठवडे हे दोन्ही सिग्नल बंद राहणार आहेत.

पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रो पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरात पर्यंत धावणार आहे. त्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. काही ठिकाणी पायाची खोदाई, काही ठिकाणी पाया आणि पिलर तर काही ठिकाणी सेगमेंट बसविण्याचे काम सुरु आहे. पिलर उभारताना रस्त्यावरील जागेचा जास्त उपयोग होत असल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरुंद झाला आहे. मोरवाडी येथील अहिल्याबाई होळकर चौक आणि पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिलरचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सिग्नल बंद ठेऊन वाहतूक मोकळी करण्यात आली आहे.

महामार्गावरील एकच लेन सुरु आहे. सिग्नल सुरु ठेवल्यास काही कालावधीत वाहनांच्या रांगा लांबपर्यंत जातात. पर्यायाने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मागील चार दिवसांपासून सिग्नल बंद ठेवण्यात आले आहेत. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पिंपरी वाहतूक पोलीस दोन्ही चौकांमध्ये कार्यरत आहेत. चौकातील सिग्नलचा एक पोल देखील हलविण्यात येणार असल्याचेही तावसकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.