Pimpri : खासदार बारणे यांच्या उमेदवारीला भाजप नगरसेवकांचा विरोध; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र

युती झाल्यास बारणे यांचे काम करणार नसल्याची भूमिका

एमपीसी न्यूज – राज्यस्तरावर शिवसेना-भाजपच्या युतीच्या चर्चा सुरु असताना पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.

गेल्या पाच वर्षात बारणे यांनी भाजप सरकारच्या निर्णयावर सातत्याने टीका केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून बारणे यांना निवडून आणले. परंतु, निवडून आल्यानंतर बारणे यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारणे शिवसेनेचे उमेदवार असल्यास आणि युती झाल्यास तर आम्ही त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आहे.

पिंपरी दौ-यावर रविवारी (दि. 10)आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या लेटरहेडवर पत्र दिले आहे. त्यावर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, शितल शिंदे, नगरसेविका शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेसोबत युती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. शिवसेनेसोबत युती करण्यास पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांची काहीही हरकत नाही. स्थानिक पातळीवर बारणे यांना भाजपचा कोणताही राजकीय त्रास नव्हता. तरीही, त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका आणि आरोप केले आहेत. त्याचा पिंपरी-चिंचवडमधील जनतेने महापालिका निवडणुकीत बदला घेतला. बारणे यांचे चार नगरसेवक सुद्धा जनतेने निवडून दिले नाहीत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाली आणि मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, तसेच शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली. तर, भाजपाचा कोणताही कार्यकर्ता बारणे यांचे काम करण्यास इच्छुक नाही. शिवसनेने बारणे यांच्याऐवजी दुसरा कुठलाही कार्यकर्ता इच्छुक असल्यास आम्ही जोमाने काम करु. आगामी निवडणुकीत युती झाली आणि मावळ मतदार संघ शिवसेनेला गेला, तसेच शिवसेनेने खासदार बारणे यांना उमेदवारी दिली. तर, शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागेल. त्याचे खापर भाजपवर फोडले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.