_MPC_DIR_MPU_III

Bhosari : इंद्रायणी थडीतील किल्ले प्रदर्शनाचा आकर्षण ठरतेय पाकिस्तानातील अनवट किल्ला

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात आला आहे. हा महोत्सव भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सुरु असून यात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

ग्रामीण जीवनाचे समग्र दर्शन येथे घडवण्यात येत असून याच साखळीचा आणखी एक दुवा म्हणून येथे शिवकालीन शस्त्रे, किल्ल्यांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या दालनाच्या प्रवेशद्वारासमोरच छत्रपती शिवरायांचा भव्य आणि प्रेरणादायी पुतळा साकारला आहे. येथे संपूर्ण भारतातील सुमारे 120 किल्ल्यांची छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. त्यात दक्षिणेतील, महाराष्ट्रातील किल्ल्यांची विविध दुर्गप्रेमींनी काढलेली सुमारे 150 निवडक छायाचित्रे लावण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातील किल्ले जिल्हावार चित्रीत केलेले आहेत. तसेच डोंगरी किल्ले आणि सागरी किल्ले अशी या छायाचित्रांची विभागणी केलेली आहे. तसेच येथील एक विशेष भाग म्हणजे सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये असलेले पण मराठ्यांच्या फौजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर जिंकलेल्या किल्ले अटक व किल्ले जमरुडच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे मांडण्यात आलेल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

थोरल्या शाहू महाराजांच्या निधनानंतर निर्नायकी झालेल्या मराठा साम्राज्यातील शूर सरदारांची यशोगाथा सांगणारे हे किल्ले आहेत. मानाजी पायगुडे यांच्या नेतृत्वाखालील मराठी सरदारांनी 1757 मध्ये अटकेपर्यंत मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण केला होता. अब्दालीचा वारसदार असलेल्या अब्दुल्ला समदखान रोहिल्ल्याचा पाडाव करुन लाहोर किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर डेरा, गाझी, मुलतान, पेशावरपर्यंत धडक मारत मराठ्यांचे साम्राज्य निर्माण केले. तंजावर ते पेशावर असे मराठ्यांचे साम्राज्य त्याकाळी प्रस्थापित केलेले होते. जी खैबरखिंड त्याकाळी आपल्या दृष्टीने पोचण्यासाठी अशक्य अशी मानली जात असे ती पार करुन तिच्या पायथ्याशी असलेल्या किल्ले जमरुडवर ताबा मिळवला. मराठा साम्राज्याच्या देदिप्यमान वारसा सांगणा-या त्या अटक आणि जमरुडच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे उभारण्यात आल्या आहेत.

महिला सक्षमीकरणाची संकल्पना घेऊन भरवण्यात आलेल्या महोत्सवात भारतातील आणि महाराष्ट्रातील नामवंत व कर्तृत्ववान महिलांना मानाचा सलाम म्हणून त्यांची छायाचित्रे प्रवेशद्वारापासून पुढील मार्गिकेवर लावण्यात आली आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, सिंधुताई सपकाळ ही काही महाराष्ट्रातील प्रातिनिधिक नावे. तसेच क्रीडाक्षेत्रातील मेरी कोम, सायना नेहवाल, अंतराळ भरारी घेणारी कल्पना चावला यांची येथे रेखाचित्रे आहेत. या सर्व प्रेरणादायी महिलांचे या निमित्ताने स्मरण केले असून त्यांच्या कर्तृत्वाला या जत्रेच्या माध्यमातून सलाम करण्यात आला आहे.

या सर्वाच्या जोडीने या जत्रेत फिरताना विशेषत्वाने जाणवणारी एक गोष्ट म्हणजे येथे नजरेत भरेल अशी स्वच्छता आहे. तसेच येथे येणा-या अलोट गर्दीचे नियंत्रण ही देखील एक कसोटीच आहे. पण येथील सर्व स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षक ही जबाबदारी चोखपणे सांभाळत आहेत. प्रचंड आणि तोबा गर्दीचे योग्य नियोजन येथे प्रकर्षाने दिसून आले आहे. त्यामुळे येथे भेट देणा-या लहानथोरांना या जत्रेचा मनमुराद आनंद लुटता येत आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.