Chinchwad : अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास मुलासह पालकांनाही दंड

अल्पवयीन चालकांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्‍तांचे आदेश; शुक्रवारपासून अंमलबजावणी

एमपीसी न्यूज – अल्पवयीन वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्‍त आर के पद्मनाभन यांनी दिले. शुक्रवार (दि. 15) पासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवडमधील शाळा महाविद्यालयात वाहने घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या अल्पवयीन मुलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. तसेच शाळा महाविद्यालयाच्या बाहेर रोडरोमिओंचे प्रमाणही वाढले आहे. याला आळा बसावा, यासाठी अल्पवयीन चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्‍तांनी वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्‍त नीलिमा जाधव यांना दिले आहेत. यापूर्वी वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केली होती. आता मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीला खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेचे कर्मचारीही असणार आहे.

अशी होणार कारवाई

अल्पवयीन वाहन चालकाला पकडल्यानंतर त्याच्या पालकांना पोलीस चौकीत बोलावून पोलिसांकडून पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येईल. त्यानंतर अल्पवयीन वाहन चालक आणि त्यांचे पालक आणि इतर कोणाचे वाहन असल्यास त्याचा मालक यांच्यावर पोलीस दंडात्मक कारवाई करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.