Pune : खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन व्यवहार करून 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- देवाची उरूळी (आवताडे हांडेवाडी, ता. हवेली, जि,पुणे) येथील मालकीची 6 गुंठे जागा चुकीची दाखवून 20 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दत्तू किसन न्हावले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍याची जागा दाखवुन त्या जागेचा केवळ पैशांसाठी खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन व्यवहार केल्याप्रकरणी फसवणुकीबाबत शामसुंदर सिताराम कलंत्री (वय 60) राहणार वर्धमानपुरा सोसायटी मार्केटयार्ड पुणे -३७ यांनी तक्रार केली आहे.

याप्रकरणी शामसुंदर कलंत्री यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे. आरोपीमध्ये दत्तू न्हावले यांचा मुलगा अशोक दत्तू न्हावले व्यवहार पाहात होता. अशोक न्हावले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून, सरपंच आहेत. जमीनीचा चुकीचा 7/12 दाखवून त्यांनी हा व्यवहार केला. सदर प्रकरणात मध्यस्त म्हणून जागेचा दलाल कमलेश शांतूभाई पटेल हा होता. पटेल आणि न्हावले यांनी दोघांनी संगनमतानी हा गैरव्यवहार केल्याचे कलंत्री यांनी सांगितले आहे.

याबाबत माहिती देताना शाम कलंत्री यांनी सांगितले, “दत्तू किसन न्हावले (न्हावलेनगर, हांडेवाडी पोस्ट, देवाची उरूळी) यांच्या बरोबर त्यांच्या मालकीची हांडेवाडी येथील 6 गुंठे जागा ही 48 लाख रू. ला मी विकत घेण्याबाबत लेखी व्यवहार केला असून, त्याबदल्यात मी न्हावले यांना विसार म्हणून रूपये 20 लाख सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मार्केटयार्ड पुणे या बँकेतून आर.टी.जी.एस. द्वारे न्हावले यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडकी या खात्यावर पाठविलेले आहेत. सदरची जागा ही ताब्यात घेण्यासाठी मी गेलो असता पुर्वी दाखवलेली जागा ही चुकीची असल्याचे लक्षात आले. त्याबाबत न्हावले यांच्याकडे विचारणा केली असता न्हावले यांनी तुम्ही ती जागा ताब्यात घेऊ शकत नाही, असे मला सांगितले. तसेच मी त्यांना विसार म्हणून दिलेली 20  लाख रूपयांची रक्कम परत देतो असे सांगून त्यांनी मला दिनांक 12 जानेवारी 2018 रोजी धनादेश दिला होता. परंतु घरगुती कारण सांगून त्यांनी तो धनादेश मला बँकेत भरू दिला नाही. पुन्हा १० एप्रिल 2018  रोजी धनादेश भरा सांगितले, परंतू तो धनादेश वटला नाही परत आला. या प्रकरणी मी त्यांना रितसर नोटीस पाठवली तरी त्या नोटीसीचे उत्तर आणि माझे 20 लाख रूपये अद्याप मला मिळालेले नाहीत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.