Pimpri : गृहप्रकल्प उभारताना विश्वासात न घेतल्याने प्रकल्पास स्थगिती द्या

विलास मडिगेरी यांची प्राधिकरण अध्यक्षांकडे मागणी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून प्रभाग क्रमांक 8 मधील सेक्टर 6 येथे जलवायुविहार सोसायटी शेजारील एल.आय.जी. करिता भूखंड क्र. 30,31,32,33 ते 39 आणि 61 ते 76 येथे आणि इ.डब्ल्यु.एस. करिता भुखंड क्र. 40 ते 45, 41, 47 ते 60 या प्लॉटवर या दोन्ही ठिकाणी स्कीम प्रस्तावित करुन कामाला सुरुवात केली आहे. स्थानिक लोकप्रतिनीधी म्हणून आम्हाला या दोन्ही प्रकल्पाच्या संदर्भात प्रस्ताव सादर केल्यापासुन ते कामाचा आदेश देऊन काम सुरु होईपर्यंत विश्वासात घेतले नाही, तसेच कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना देण्यात आली नाही. अशी तक्रार नगरसेवक विलास मडिगेरी यांनी शनिवारी (दि. 16) पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे केली आहे. या प्रकल्पास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी मडिगेरी यांनी केली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनामध्ये विलास मडिगेरी यांनी म्हटले आहे की, सेक्टर क्र. 4,6,9,11,13 या भागामध्ये प्राधिकरणाकडून सेक्टर ४ मध्ये एकमात्र टेनिसकोर्टची व सेक्टर 9 येथील बास्केट बॉलची उभारणी करुन महापालिकेकडे वर्षभराच्या कालखंडात हस्तांतरीत केला आहे. नुकतेच सेक्टर 4 येथे साईनाथ हॉस्पिटलच्या मागे प्राधिकरणाद्वारे एक एकर मध्ये उद्यान विकसित करणे काम सुरु केले आहे. सेक्टर 4 ट्रॅफिक पार्क समोरील मोकळा भूखंड प्राधिकरणाकडुन मनपाकडे हस्तांतरीत केल्याने सदर भूखंडावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आमच्या प्रयत्नाद्वारे 30,000 चौ.फुटामध्ये उद्यान विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या वरील चार प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य सुविधा सेक्टर ६ मधील नागरिकांसाठी क्रीडांगण व उद्यानाची एकही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही.

त्यामुळे नागरिकांमध्ये अंसतोष असल्यामुळे वारंवार आमच्याकडे मागणी होत आहे. त्यामुळे आपल्या मार्फत सेक्टर ६ मध्ये उद्यान व क्रीडांगण त्वरित विकसित करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत किंवा अशा प्रकारचे प्लॉट महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यास महानगरपालिकेमार्फत विकसित करण्याचे प्रयत्न करता येतील.

सदर सेक्टर क्र. 4,6,9,11,13 येथे आपल्या प्राधिकरणाकडुन विविध सोसायट्याना खूप मोठ्या प्रमाणात प्लॉट विक्री करण्यात आली. तसेच या सर्व सेक्टर मधील शेकडो सोसायट्या उभारणेत आल्या असुन तेथे नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असुन त्या भागांमध्ये नागरिकांच्या सोई-सुविधांच्या दृष्टीने क्रीडांगणे, उद्यान, सांस्कृतिक भवन, भाजी मंडई, इतर अनुषंगिक बाबीचा विचार केला गेला नाही.

सदर एल.आय.जी. आणि ई.डब्ल्यु.एस. स्कीमचे काम सुरु केले असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सोसायटी आणि नागरिक एकत्र येऊन काम चालु असलेल्या ठिकाणी या दोन्ही स्कीमच्या विरोधात आंदोलन करणेच्या भूमिकेत आहेत असे घडल्यास या भागातील वातावरण व कायदा सुव्यवस्था बिघडु नये, यासाठी काळजी व दक्षता म्हणून चालू केलेल्या एल.आय.जी. आणि ई.डब्ल्यु.एस. कामास स्थगिती देऊन सदर प्रोजेक्ट सेक्टर 6 ऐवजी सेक्टर क्र. 12 येथील पंतप्रधान आवास योजना स्कीमच्या जवळपास किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र व राज्य या दोन्ही शासन स्तरावर प्रत्येकाला घर देण्याची संकल्पना असुन विविध ठिकाणी कमी उत्पन्न गटातील सर्व लोकांना घर देण्याची योजना राबवित आहे. त्या भूमिकेस सत्ताधारी पक्षाचा एक जबाबदार नगरसेवक म्हणुन माझा अशा प्रकारच्या प्रोजेक्टला पाठिंबा असून सदर प्रकल्प फक्त सेक्टर क्र. 6 ऐवजी सेक्टर 12 येथील पंतप्रधान आवस योजना स्कीमच्या जवळील जागेत स्थलांतरीत करणेबाबत आमची आग्रही मागणी आहे. तसेच सदर प्रकल्पाच्या स्थलांतराचा विचार न केल्यास सेक्टर 6 मधील स्थानिक नागरिकांच्या भूमिकेबरोबरच आम्हाला उभे राहावे लागेल. तरी या प्रकल्पास त्वरित स्थगिती देण्यात यावी, तसेच सेक्टर 6 ऐवजी अन्यत्र स्थलांतरीतचा निर्णय आपल्या अधिकाराखाली किंवा शासन स्तरावर लवकरात लवकर घ्यावा असे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.