Maval : मनोरंजनाचा कार्यक्रम रद्द करून मौजे नागाथली ग्रामस्थांनी दिली शहीद जवानांना आदरांजली

एमपीसी न्यूज- काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली म्हणून मौजे नागाथली ग्रामस्थांनी उद्या मंगळवारी आयोजित करण्यात आलेला म्हसोबा देवाच्या उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निश्चित केले आहे. शिवाय या उत्सवानिमित्त होणारा रंगीत संगीत भजनी भारुडाचा कार्यक्रम रद्द करून मावळातील अनेक गावांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मंगळवारी (दि.१९) मेणबत्ती मोर्चा काढून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

मौजे नागाथली ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे उद्या मंगळवार (दि. 19) आणि बुधवार (दि. 20) म्हसोबा देवाचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवामध्ये कीर्तन, हरिनाम सप्ताह तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साईनाथ कला नाट्य मंडळ, चांदूस-खेड यांचा रंगीत संगीत भजनी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी संबंधित नाट्य मंडळाला 5000 रुपये आगाऊ रक्कम देण्यात आलेली होती.

दरम्यान, काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला होऊन 41 जवान शहीद झाल्याची दुःखद घटना घडली. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरामध्ये उमटले. मौजे नागाथली ग्रामस्थांनी देखील सामाजिक जबाबदारीचे भान राखत म्हसोबा देवाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले. यामध्ये नेहमीप्रमाणे धार्मिक विधी, भजन, जागर असे कार्यक्रम होणार असले तरीही आगाऊ बिदागी देऊन आयोजित केलेला मनोरंजनाचा कार्यक्रम रद्द करून शहीदांना आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली आहे. मंगळवारी (दि. 19) मेणबत्ती मोर्चा काढून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

मौजे नागाथली ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचे अनुकरण मावळामधील इतर गावांनीही करून एक आदर्श निर्माण केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.