Pimpri : आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात प्रवेशिका सादर करण्यासाठी उरले केवळ दहा दिवस

'पिंपरी चिंचवड फिल्म क्लब'च्या वतीने पिंपरी चिंचवड आंतरराष्टीय लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे (PCISFF) आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 16 आणि 17 मार्च रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे होणार आहे. हा महोत्सव शहरातील हौशी आणि चित्रपट प्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ आहे. महोत्सवासाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी केवळ दहा दिवस उरले आहेत. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत गुरुवार (दि. 28 फेब्रुवारी) पर्यंत आहे. त्यामुळे शहरातील चित्रपट निर्मात्यांनी प्रवेशिका (लघुचित्रपट) लवकरात लवकर सादर कराव्यात असे आवाहन महोत्सवाचे संचालक अविनाश कांबीकर आणि दत्ता गुंड यांच्याकडून करण्यात आले आहे.

समाजातील प्रत्येक गोष्टीला मुद्देसूदपणे मांडण्यासाठी लघुचित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. समाजाची दृष्टी आणि दृष्टिकोन या दोन्ही गोष्टी काही मिनिटांमध्ये लघुचित्रपटाच्या माध्यमातून मांडता येतात. कलेचा कस वापरून एक सकारात्मक विचार समाजात पसरवता येतो. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात असे अनेक कस असलेले कलाकार, टेक्निशियन आहेत. त्यांच्या प्रतिभेला चालना मिळण्यासाठी पिंपरी चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाचे लघुचित्रपट पाहण्यास मिळणार आहेत.

पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा देखील होणार आहे. महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध देशांमधून या महोत्सवाला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिभावान कलाकारांनी तसेच चित्रपट प्रेमींनी महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका सादर कराव्यात. तसेच पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी http://www.pimprichinchwadisff.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.