Pimpri : मयूर कलाटे देणार नगरसेवकपदाचे मानधन संरक्षण सहाय्यता निधीस

महापालिका आयुक्त व नगरसचिवांना दिले पत्र

एमपीसी न्यूज – काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांच्या मुलामुलीचे शिक्षण, त्याच्या आई-वडिलांचे आजारपण आणि त्यांच्या कुटूंबियांना मदत व्हावी, याकरिता 1 मार्च 2019 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत या कालावधीतील आपले नगरसेवकपदाचे दरमहा असलेले 15 हजार रुपये मानधन हे केंद्र सरकारच्या संरक्षण सहाय्यता निधीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे देणार आहेत. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नगरसचिव उल्हास जगताप यांना पत्र दिले आहे. त्या पात्रात असे म्हटले आहे की, जम्मु-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभर संताप व्यक्त होत आहे. या आधीही दहशतवाद्यांनी कारगिल, पठाणकोट आणि उरी याठिकाणी केलेल्या चकमकीमध्ये भारतीय जवान शहीद झाले आहेत. या घटना घडल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळते. बंद पुकारले जातात, कॅंडल मार्च काढले जातात. शहीद जवानांच्या कुटूंबाबाबत संवेदना जाहीर करुन आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले जाते.

केंद्राकडून व राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. तथापि, ती पुरेशी नसते. तसेच त्या कुटुंबातील कर्तामाणूस गेल्यानंतर आर्थिकदृष्टया ते कुटुंब अडचणीत येते. काही दिवसांनी आपण त्या कुटुंबाला विसरुन जातो. दोन पाच वर्षानी त्या शहीदांच्या कुटुंबियांची काय अवस्था आहे याची जाणीव आपणाला राहत नाही. अनेकदा शहीदांच्या कुटुंबियांना फार मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागते. त्यांच्या मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचे आजारपण इत्यादी गोष्टींना त्यांना पुरेसे आर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यावेळी आपल्या जाणिवा बोथट झालेल्या असतात.

देशासाठी आपले प्राण पणाला लावणा-या शहीद जवानांच्या कुटुंबियांना थोडीफार आर्थिक मदत व्हावी. सामाजिक बांधिलकी जोपासत मी 1 मार्च 2019 पासून ते माझ्या नगरसेवकपदाचा कालावधी फेब्रुवारी 2022 पर्यंतचे मानधन केंद्र सरकारच्या संरक्षण सहाय्यता निधीस ( नॅशनल डिफेन्स फंड) देण्यात यावे, असे कलाटे यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.