मिस्टर & मिसेस लांडगे,,,,,- “धमाल गोंधळ कमाल चकवा” धमाल मनोरंजन (व्हिडिओ)

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- गोंधळ आणि संशय निर्माण झाले की माणसाच्या मनात विचारांचे काहुर माजते. त्यामधून विनोदनिर्मिती होते. एकमेकात गुंतलेले प्रसंग आणि सहज सुचलेल्या थापांमुळे प्रसंग निभावून जातो. ही सारी धमाल, मनोरंजन- मिस्टर and मिसेस लांडगे मध्ये अनुभवायला मिळेल.

मिस्टर and मिसेस लांडगे हे एक धमाल करणारे नाटक कल्पना कोठारी यांनी आपल्या रंगनील या नाट्यसंस्थेतर्फे सादर केले आहे. लेखन सुरेश जयराम यांचे असून दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. नेपथ्य -दिनेश मेस्त्री संगीत- अमीर हडकर प्रकाशयोजना- शीतल तळपदे यांची असून त्यामध्ये परी तेलंग,सुशांत शेलार, भूषण कडू, राजेश भोसले, मधुरा देशपांडे, अलका परब, रमा सोहनी रानडे, अमर कुलकर्णी, प्रियांका कासले असे कलाकार असून एक धमाल उडवणारी टीम आहे.

मिस्टर लांडगे हे आणि रसिक कोल्हे यांची लांडगे आणि कोल्हे पब्लिशर ही कंपनी असते. लांडगे यांच्या नवीन घरातील इंटीरिअरचे काम मिसेस लांडगे यांच्याओळखीचा हसमुख नावाचा इसम करत असतो. त्याचे काम त्याच्या पद्धतीने चालू असते. एक दिवस मि लांडगे आणि मिसेस लांडगे यांना एका पार्टीला जायचे असते. त्या तयारीत ते असतात. पार्टीला जायचा म्हणून हसमुख खुश असतो.कारण त्याला दोन तास घरातील मोलकरीण मंजुळे बरोबर वेळ घालवायला मिळणार असतो. मि लांडगे चा पार्टनर रसिक कोल्हे हा मोनिका नावाच्या एका टेलिफोन ऑपरेटरच्या मागे लागलेला असतो. लांडगे कुटुंब पार्टीला जाणार आहे असे समजल्यावर तो दोन तासा पुरता मोनिकाला त्यांच्या घरी बोलावतो.

त्याचवेळी रसिकची बायको देवयानी हिचे योगा क्लासमधील विश्वास किल्लेदार बरोबर लफडे सुरु असते. आणि त्याला ही लांडगे यांच्या घरी बोलवायची योजना आखते. मिसेस लांडगे ला दोन तास परवानगी द्यावी अशी देवयानी सुचवते. पण मिसेस लांडगे परवानगी देत नाहीत. हसमुखला मंजुळाबरोबर दोन तास घालवायचे असतात, विश्वास किल्लेदार यांनी देवयानीला लिहिलेले प्रेमपत्राचे एक पान मिस्टर लांडगे यांना मिळते. त्या प्रेमपत्राची इतर पाने त्यांना मिळत नाहीत- पत्रा मधील प्रेमाचा लिहिलेल्या मजकुरामुळे अधिक संशय वाढत जातो. मिस्टर लांडगे पार्टीला जाण्याचा विचार सोडून देतात- पत्राचा छडा लावायचे ठरवतात पण देवयानी, रसिक, हसमुख, हे लांडगे दाम्पत्य पार्टीला जावे असा आग्रह धरतात पण असे काही घडत नाही.

प्रत्येक प्रेमवीरांचे जोडीदार तेथे येण्यास सुरवात होते. कोणालाच बदललेला बेत कळवलेला नसल्याने आणि त्यात भरीसभर म्हणून तेथे एक लेखिका मिस ढमढेरे तेथे येतात. त्यांना त्यांचे पुस्तक ” लांडगे-कोल्हे पब्लिशर” कडून छापुन घ्यायाचे असते- आणि मग गोंधळात गोंधळ वाढत जातो. आणि एक धमाल नाट्यमय प्रसंगाला सुरवात होते. नाटकाची विनोदाची भट्टी छान जपून आली आहे. वेगवान घडणारया घटना, त्यांची गुंफण छान जमून आली आहे. एक विलक्षण गतिमान प्रसंगामध्ये प्रत्येक कलाकारांचा सहभाग उत्तम आहे . दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नाटकाची गती उत्तम राखली आहे. नाटकाचे नेपथ्य, संगीत, आणि प्रकाश योजना नाटकाला पूरक अशी आहे..

खासकरून सुशांत शेलार, भूषण कडू, परी तेलंग, राजेश भोसले, यांनी धमाल आणली आहे. त्यांना साथ मधुरा देशपांडे, रमा सोहनी- रानडे, प्रियांका कासले, अमर कुलकर्णी यांची लाभली आहे. नाटकामधील मजा धमाल ही अनुभवण्यासारखी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.