Pune : पुणे महानगरपालिकेच्या स्थायीसमितीचे 6 हजार 765 कोटींचे अंदाजपत्रक सादर

एमपीसी न्यूज- पुणे महानगरपालिकेच्या 2019-20 या आर्थिक वर्षाचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 6 हजार 85 कोटींचे अंदाज पत्रक मागील महिन्यात सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीने अंतिम अंदाजपत्रकात अनेक योजनांना प्राधान्य देत महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकात जवळपास 700 कोटीने वाढ करीत स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी 6 हजार 765 कोटींचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेला सादर केले.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे  तसेच नगरसेवक आणि अधिकारी सभागृहात उपस्थित होते.

या अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये

# पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या चोवीसतास समान पुरवठा योजनेअंतर्गत 60 साठवण टाक्यांचे काम प्रगतीपथाववर असून त्यातील मार्च 2019 अखेरपर्यंत 25 टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामासाठी 301 कोटी 40 लाख रुपयांची विशेष तरतूद

# भामा आसखेड धरणातून शहराच्या पूर्वभागाला पाणीपुरवठा आहे. त्या बाबतचे काम मार्च 2019 अखेर पर्यत पूर्ण होणार आहे. तसेच या प्रकल्पातील बाधितांसाठी मोबदला देण्यात येणार असल्याने या प्रकल्पासाठी 185 कोटींची तरतूद

# पुणे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात 195 किलोमीटर मेट्रोचा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. तर त्या अंतर्गत रामवाडी ते लोहगाव विमानतळ, रामवाडी ते वाघोली असा डीपीआर तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी 8 कोटीची तरतूद

# एचसीएमटीआर प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने 200 कोटींची तरतूद

# शहरातील अनेक रस्त्यावर ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद

# पीएमपीएमएलच्या ताफ्यात महिलांसाठी 27 तेजस्विनी बसची खरेदी. तसेच ई बसला वाढता प्रतिसाद लक्षात घेता 105 कोटी आणि 800 बससेसाठी 75 कोटीची तरतूद.

# पीएमपीएमएल मधून प्रवास करणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तींना मोफत पास दिला जातो. अशा व्यक्तींची 1500 संख्या असून त्यासाठी 30 लाख रुपयांची तरतूद

# केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या नदी सुधार प्रकल्पासाठी 7 कोटींची तरतूद

# मुळा मुठा शुद्धीकरण प्रकल्पासाठी पुढील तीन वर्षांसाठी 277 दश लक्ष लिटर क्षमते चे 6 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आणि 70 किलोमीटर मलवाहिन्या विकसित करण्यासाठी 80 कोटींची तरतूद.

# बी जे महाविद्यालयाच्या धर्तीवर डॉ नायडू रुग्णालयाच्या आवारात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महविद्यालय उभारण्यासाठी 10 कोटींची तरतूद

# महापालिकेच्या 19 प्रसूतिगृहामध्ये स्मार्ट स्कोप हे कर्करोगाचे निदान करणारे उपकरण उपलब्ध केले जाणार आहे. त्यासाठी 1 कोटीची तरतूद.

# पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेसाठी 7 कोटींची तरतूद

# भटके आणि मोकाट कुत्र्यांची दरवर्षी 12 हजार जणांची नसबंदी केली जाते. त्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने ४ कोटीची तरतूद

# ई कचरा आणि प्लास्टिक कचरा संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार असून त्यासाठी 2 कोटींची तरतूद

# पुणे महापालिकेतील पदाधिकारी अधिकाऱ्यांसाठी भाडे तत्वावर ई मोटारी घेण्यात येणार, त्यासाठी 1 कोटीची तरतूद

# उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये बायोमायनींग आणि भू भराव टाकणे यासाठी 10 कोटी 50 लाखांची तरतूद

# पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावामध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 192 कोटींची तरतूद

# पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत, त्यासाठी 1 कोटी 36 लाखांची तरतूद

# चांदणी चौकातील बीडीपीच्या 50 एकर जागेत शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या कामासाठी गती मिळावी या करिता 26 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद

# गीत रामायणकार ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी 50 लाख, आद्य क्रांती लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी 3 कोटी 50 लाख 50 हजाराची तरतूद.

# बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास आरखडा तयार केला जाणार आहे. या कामासाठी 11 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद

# वारकरी सांस्कृतिक भवन 2 कोटी 17 लाख 50 हजार, हज हाऊस उभारण्यासाठी 1 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांची तरतूद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.