Pimpri : डिसेंबरअखेर दापोडी ते पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचे काम पूर्ण होणार

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोच्या वतीने दापोडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका भवन या मार्गावरील तब्बल 52 टक्के काम पूर्ण झाले आहे. लोहमार्ग (ट्रॅक) टाकण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने लोहमार्ग टाकण्याचे काम हाती घेतले जाईल. पावसाळ्यापूर्वी फाउंडेशनची कामे पूर्ण केली जाणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने काम सुरु असल्याचे, रिच वनचे कार्यकारी संचालक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले.

दापोडी ते महापालिका भवन स्टेशन हे अंतर 6.7 किलोमीटर इतके आहे. या मार्गावरील एकूण 286 पैकी 258 फाउंडेशन घेण्यात आले आहेत. त्यातील सर्वांधिक फाउंडेशन नाशिक फाटा चौकात असून, पिंपरी व मोरवाडी चौक, खराळवाडी येथील फाउंडेशनचे काम सुरू करणे शिल्लक आहे. नाशिक फाटा येथे 5 ड्रायपॉडने पायलिगचे काम सुरू आहे. एकूण 192 पिलर उभे केले गेले असून 141 पिलर कॅप तयार झाले आहेत.

पिंपरी व दापोडी स्टेशनचे काम वेगात सुरू आहे. त्यापैकी संत तुकारामनगर येथील पिलर आर्मवर स्पॅनची जुळवणीचे काम नुकतेच सुरू झाले आहे. त्यावर प्लॅटफार्म पिअर आर्मचे कामही सुरू करण्यात आले आहे. एकूण 89 स्पॅनची जुळवणी पूर्ण झाले असून, हे अंतर 2.6 किलोमीटर इतके आहे. स्पॅनवर विद्युतविषयक कामासाठी केबल व खांबाचे काम संबंधित कंपन्यांमध्ये तयार केले जात आहे. ट्रॅक टाकण्याची निविदा अद्याप सुरू असून, एप्रिलपासून काम सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो मार्गासाठी वीज पुरवठा करण्यासाठी वल्लभनगर एसटी आगार येथे पॉवर सबस्टेशन सुरू करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

खराळवाडी ते नाशिक फाटा चौकापर्यंत काम संपल्यानंतर तेथे दुभाजक पूर्ववत करून रस्ता मोकळा केला जाणार आहे. हे काम 3 वेगवेगळ्या ठेकेदारामार्फत सुरू आहे . खराळवाडी ते संत तुकारामनगर मार्गावर हे काम वेगात सुरू असून, काही ठिकाणी बंद केलेल्या दोन्ही बाजूच्या लेन वाहतुकीस खुल्या केल्या आहेत. तसेच, फुगेवाडी व कुंदननगर येथे दुभाजक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तेथील लेनही टप्पाटप्प्याने खुली केली जाणार आहे, असेही बि-हाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.