सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

निवडणूक कामासाठी पीएमपीएमएलच्या 900 बसेसची मागणी, प्रवाशांचे होणार हाल

निर्णय रद्द करून 1500 बसेस मार्गावर आणण्याची पीएमपी प्रवासी मंचची मागणी

 

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या होणा-या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 20 आणि 21 या दोन दिवशी पीएमपीएमएलच्या 900 बसेसची मागणी केली आहे. त्यामुळे या दोन दिवशी पुण्याच्या रस्त्यांवर केवळ 300 बसेस धावणार असून यामुळे पीएमटीने प्रवास करणा-यांचे हाल होणार आहेत. सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात 1200 बसेस आहेत. 

 

निवडणुकीच्या कामासाठी राज्य निवडणुकीला देण्यात येणा-या या बसेसच्या बदल्यात पीएमपीएमएलला प्रतिदिवशी 10 हजार रुपये इतके भाडे देण्यात येणार आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी प्रवाशांना याबाबत कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना देण्यात न आल्याने ही प्रवाशांची फसवणूक असल्याचा आरोप पीएमपी प्रवाशी मंचाकडून निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

 

दरम्यान, आधीच पीएमपीएमएलच्या ताफ्यात असणा-या बसेसच्या कमतरतेमुळे हाल सोसणा-या प्रवाशांचे 900 बस दिल्याने आणखी हाल होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय रद्द करुन किमान 1500 बसेस नागरिकांसाठी रस्त्यावर उतरवण्याची तसेच निवडणुकीच्या दिवशी मोफत प्रवास देत मतदान करण्यास प्रोत्साहन करण्याची मागणी पीएमपी प्रवासी मंचातर्फे करण्यात आली आहे.

 

काय आहेत पीएपी प्रवाशी मंच्याच्या निवेदनातील मुद्दे –


# सध्या मार्गावरील 1200 बसेसमध्ये दररोज 750 प्रति बस प्रमाणे 9-10 लाख नागरिक प्रवास करतात. पीएमपीच्या निवेदनाप्रमाणे 900 बसेस निवडणुकीसाठी देण्यात येणार आहेत.

# उर्वरित 300 बसेसमध्ये 2.25 लाखच प्रवासी प्रवास करू शकतील, नेहमीच्या इतर 7-8 लाख प्रवाशांनी काय करावे ? असा प्रश्न उपस्थित करत पुढील मागण्या केल्या आहेत.

1. लाखो नागरिकांचे अतोनात हाल होणार आहेत. पीएमपीच्या सदर निर्णयास तातडीने स्थगिती द्यावी.

2. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या 60 लाख नागरिकांच्या एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएमएलद्वारे नागरिकांची घोर फसवणूक

3. दोन्ही महापालिकेची हजारो वाहने आचारसंहितेमुळे ताब्यात घेतली आहेत. त्यांचा वापर, तसेच हवे असल्यास निवडणुकीच्या सुट्टीमुळे विनावापर असलेली शासकीय व खाजगी वाहने मागवून त्यांचा वापर करावा.

4. शासकीय सुट्टी असली तरी सर्वच खाजगी आस्थापने पूर्णवेळ/अंशवेळ सुर असणार आहेत, व सर्व व्यापार व्यवसायही सुरूच असणार आहेत. नेहमीच्या बस प्रवाशांना अडवणूक करणाऱ्या रिक्षा व इतर पर्यायांसाठी खूप जास्त खर्च करावा लागणार आहेत.

5. नागरिकांची, प्रवाशांची, पासधारकांची घोर अन्याय्य फसवणूक आहे.

6. हजारो खाजगी वाहने रस्त्यावर वाढतील.

7. कायमच्या लाखो ग्राहक/प्रवासीकडे अक्षम्य दुर्लक्ष, व प्रति बस दहा हजार रुपयाच्या प्रलोभनापोटी अयोग्य निर्णय ??

8. कोणत्या मार्गावरील कोणत्या फेऱ्या रद्द होणार याची कोणती ही माहिती दिलेली नाही. नागरिकांचा संभ्रम व गोंधळ होणार आहे.

9. मतदानकेंद्रावर मतदानासाठी बसने जाण्याचा नागरिकांचा पर्याय बंद, उमेदवारांना मतदारांना वाहनाने आणण्याची अयोग्य संधी.

10. पीएमपी अध्यक्षपद सांभाळणाऱ्या मनपा आयुक्तांनी प्रवासी हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे.

11. उलटपक्षी , किमान 1500 बसेस नागरिकांसाठी मार्गावर आणून निवडणूकीच्या दिवशी मोफत प्रवास देऊन मतदान करण्यास प्रोत्साहन द्यावे.

spot_img
Latest news
Related news