Moshi : गृहयोजनेचे स्थलांतर करा; नागरिकांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी संतनगर येथील पेठ क्रमांक सहामध्ये उभारण्यात येणा-या गृहयोजनेचे अन्यत्र स्थलांतर करण्याची नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे या प्रकल्पात योग्य तो बदल करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरण प्रशासनाला केल्या आहेत.

याबाबत प्राधिकरण कार्यालयात बैठक झाली. प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका नम्रता लोंढे, नगरसेवक विक्रांत लांडे, संजय वाबळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे उपस्थित होते.

प्राधिकरणातर्फे सेक्टर सहा येथे गृहप्रकल्प बांधण्याचे नियोजित आहे. या गृहयोजनेत 384 सदनिका आणि 16 रोहाऊस होणार आहेत. या गृहयोजना होणा-या परिसराजवळ राहणा-या नागरिकांना उद्यान, खेळाचे मैदान, महापालिका शाळा, विरंगुळा केंद्र नाही. त्यामुळे प्रकल्प तेथून सस्थांलतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रकल्पाला विरोध नाही. परंतु, दुस-या ठिकाणी स्थलांतरित करुन सर्व सोयी-सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “पेठ क्रमांक 11 किंवा 12 मध्ये हा प्रकल्प करावा. तिथे जागा शिल्लक आहे” महापालिकेतर्फे जे काही करता येईल ते करण्याचे आश्वासन स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी दिले. नागरिकांच्या मागणीनुसार गृहयोजनेत बदल केले जातील, असे प्राधिकरणाचे अध्यक्ष खाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.