Chinchwad : महाराष्ट्राच्या विकासामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा- बाजीराव सातपुते

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र हे सर्वांगीण विकासाचे देशातील एक अग्रेसर राज्य व्हावे यासाठी धोरणसुत्री तयार करून त्याची विनाविलंब अंमलबजावणी होण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी प्रशासनात शिस्त निर्माण केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन भारत सरकार पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार प्राप्त पुरस्कार प्राप्त बाजीराव सातपुते यांनी केले.

यशवंतराव चव्हाण जयंती उत्सवानिमित्त शाहुनगर – संभाजीनगर – कृष्णानगर – मोरेवस्ती – शिवतेजनगर – पूर्णानगर राजे शिवाजीनगर व इंद्रायणीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी यशवंतराव चव्हाण व उदयोजक निर्मिती या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

यावेळी यशवंतराव चव्हाण स्मारक समिती अध्यक्ष सुनील जाधव , माजी प्रभाग सदस्य जितू पवार, सातारा मित्र मंडळ अध्यक्ष
गोपीचंद जगताप, एमपीसी न्यूज चे अनिल कातळे, नारायण ओंबळे, नितीन निकम, सोमेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.

बाजीराव सातपुते पुढे म्हणाले, ” यशवंतरावजी चव्हाण हे या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनी यशवंतरावजींनी कृषी व औद्योगिक धोरणाची घोषणा करून ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणात एका नव्या पर्वाला प्रारंभ केला. ग्रामीण जीवन, ग्रामीण भाग, ग्रामीण माणसं हा त्यांच्या विचारांचा व कृतीचा स्थायीभाव होता त्यामुळेच त्यांना ग्रामीण विकासाच्या कल्पना सुचत असत. पिंपरी चिंचवड शहराला औद्योगिक नगरी हे नाव यशवंतरावांच्या मुळे मिळाले. पिंपरी-चिंचवड मधला पहिला कारखाना हिंदुस्तान एंटीबायोटिक्स यशवंतरावांच्या मुळे आला आणि तेथून पुढे ह्या शहराला अनेक कारखाने मिळाले. त्यातून अनेक तरुणांच्या हाताला काम मिळालं. आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजनेचा प्रारंभ केला, मूलभूत सोयी सुविधांसाठी कोयना व उजनी चा प्रकल्प उभारणीला गती दिली, सहकाराला चालना मिळण्यासाठी 18 सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली, परंतु स्वतःच्या नावावर एकही कारखाना करून घेतला नाही”

सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले तर आभार अरविंद वाडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मारक समिती, सातारा जिल्हा मित्र मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंचच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.