Maval, Shirur: अखेर मावळातून पार्थ पवार, शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर

एमपीसी न्यूज – ‘नाही..हो…नाही म्हणत’…मावळ मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना तर शिरुर मतदारसंघाची अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना  जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली. मावळात थेट पवार घराण्यातील उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक लक्षवेधी होणार असून याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाकडून संकेत देण्यात आले होते. पार्थ यांचे देखील मतदारसंघातील दौरे वाढले होते. त्यांनी देवदर्शनाला देखील सुरुवात केली आहे. पक्षाचे, मित्र पक्षाच्या पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात होते.

परंतु, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांच्या उमेदवारीबाबत तीनवेळा वेगवेगळी विधाने केल्याने संभ्रामवस्था निर्माण झाली होती. अखेर नाही..हो…नाही म्हणत पार्थ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. थेट पवार घराण्यातील उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक लक्षवेधी होणार असून याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

शिरुरमधून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कोल्हे यांनी नुकताच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कोल्हे हे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांना टक्कर देणार आहेत. आजी-माजी शिवसैनिकांमध्ये सामना रंगणार आहे. कोल्हे मूळचे जुन्नर तालुक्यातील आहेत. छत्रपती संभाजी मालिकेच्या माध्यमातून कोल्हे घराघरात पोहचले आहेत. त्यामुळे कोल्हे हे आढळराव यांना जोरदार टक्कर देतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.