Tathavade : दगडाने ठेचून तरुणाचा खून ; अल्पवयीन आरोपी दोन तासात अटकेत

एमपीसी न्यूज – दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने मित्राच्या डोक्यात दगड घालून तसेच तलवारीने वार करून खून केला. शुक्रवारी (दि.२९) सकाळी साडे नऊच्या सुमारास ताथवडे येथे ही घटना उघडकीस आली. दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने दोन तासात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

जुबेर गुलाब मुजावर (वय १९, रा. सपकाळ चाळ, सोनवणे वस्ती, ताथवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी ताथवडे सोनावणे वस्ती येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुबेर व आरोपी हे मित्र होते. ते नेहमी दारू पिण्यासाठी एकत्र बसत असत. गुरुवारी रात्री ते ताथवडे बालाजी कॉलेज कडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर दारू पिण्यासाठी बसले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. रागाच्या भरात मुजावर याने मित्राला मारण्यासाठी तलवार उगारली. त्यावेळी आरोपी याने मुजावरच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले. त्यानंतर मुजावरची तलवार घेऊन त्याच्यावरच वार करून खून केला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असता पोलीस यंत्रणा कामाला लागली.

दरम्यान आरोपी हा रावेत परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.