Pimpri : पिंपरीगावातील वीज समस्येकडे ‘महावितरण’चे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – पिंपरीगावात विजेशी संबंधित अनेक समस्या आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडीत होणे, पूर्वकल्पना न देता वीज मीटर तोडून नेणे आदी अनेक गोष्टींमुळे वीजग्राहक हैराण झाले आहेत. परंतु त्याकडे ‘महावितरण’च्या कर्मचारी, अधिका-यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

पिंपरीगावातील कार्यालयाच्या सर्व कारभाराची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग शिंदे यांनी केली आहे. राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

पिंपरीगावातच महावितरणचे कार्यालय असूनही याच भागातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. ऐन गर्मीच्या काळात दररोज सकाळी-संध्याकाळी बत्ती गुल होत असल्यामुळे नागरिकांसह दुकानदार, उद्योजक, अन्य व्यावसायिक हैराण झाले आहेत. सध्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे विद्यार्थी, पालक हैराण झाले आहेत. मात्र, याबाबत तक्रार करूनही ‘ऐकतो तो महावितरणचा अधिकारी, कर्मचारी कसा ?’ असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित रहात आहे. महावितरण कार्यालयातील अनेक कर्मचारी ड्युटीवर न जात पंख्याची हवा खात कार्यालयातच बसून असतात. तक्रार करायला गेलेल्या ग्रहकांशी उद्धट आणि उर्मटपणे उत्तरे देत असतात.

त्यामुळे नागरकांमध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे. चुकीची बिले दुरूस्तीसाठी गेलेल्या ग्राहकांना हे सर्व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात. या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर तक्रार देण्यासाठी जाणा-या ग्राहकांना, नागरिकांना जागेवर कधीच भेटत नाहीत, अशी अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाचा ‘दिव्याखालीच सर्व अंधार’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.