भामा-आसखेड धरणात 93 टक्के पाणीसाठा; 4356 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणात 93 टक्के पाणीसाठा झाला असताना धरणाचे सांडव्याचे चारही दरवाजे 10 सेंटीमीटरवर उचलून त्याद्वारे 4 हजार 356 क्युसेकने पाण्याचा विसर्ग भामा नदीपात्रात शनिवारी (दि.29) सकाळपासून सोडण्यात आला आहे.

खेडच्या पश्‍चिम भागात जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून सतत पाऊस कोसळत असल्याने भामा-आसखेड धरणात सततच्या पावसाने 93 टक्के पाणीसाठा झाला आहे. याच आठवड्यातील सोमवारी (दि.24) धरणात 86 टक्के पाणीसाठा झाला असताना पहिल्यांदा धरण सांडव्याचे दोन दरवाजे वर उचलून त्याद्वारे 925 क्युसेकने पाण्याचा विसर्ग भामा नदीपात्रात सोडण्यात आला होता.

त्यानंतर देखील धरणाच्या साखळीत रात्रंदिवस सतत पाऊस पडत असल्याने जलाशय पातळीत वाढ झाल्याने धरण प्रशासनाने सांडव्याचे चारही दरवाजांद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन 4 हजार 356 क्युसेकने भामा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. भामा नदीला पूर आला असून परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.