Pimpri : डी वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला आग ; धुरात अडकलेल्या चार मुलींची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज- पिंपरीच्या डी वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला बुधवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागून हॉस्टेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

पिंपरीच्या डी वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला बुधवारी मध्यरात्री 12 वाजता अचानक आग लागून हॉस्टेलमधील सर्व फर्निचर व अन्य साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच वल्लभनगर अग्निशमन केंद्रातून दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीची झळ पाचव्या मजल्यापर्यंत पोचली होती. आग लागल्याचे समजताच अनेक विद्यार्थिनींनी धावत खाली उतरून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र तिसऱ्या मजल्यावर तीन विद्यार्थिनी आणि पाचव्या मजल्यावर एक विद्यार्थिनी प्रचंड धूर झाल्यामुळे अडकून पडल्या होत्या. त्वरित अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत या चार मुलींची सुखरूप सुटका केली. या आगीमध्ये सर्व फर्निचर व अन्य साहित्य मिळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागल्याचे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या कारवाईत लिडिंग फायरमन भगवान यमगर यांच्यासह कर्मचारी राजेंद्र गवळी, लक्ष्मन होवाळे , सरोष फुंडे , प्रमोद जाधव, बालकृष्ण भोजने वाहनचालक राहुल शिरसोले यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.