Pimpri : आगाऊ मिळकत कर भरा अन्‌ सवलत मिळवा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 2019-2020 या आर्थिक वर्षातील मिळकतकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या बिलांची रक्कम 30 जूनपर्यंत एक रकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. या योजनेचा माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग नागरिकांना लाभ होणार आहे. नागरिकांनी आगाऊ कराचा भरणा करुन सवलीताचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख सहा हजार 927 मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलांची रक्कम 30 जून 2019 पर्यंत आगाऊ भरणा-या मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. यामध्ये माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी राहत असलेल्या मिळकतीस 50 टक्के, महिलांच्या नावे असलेल्या निवासी घरास 50 टक्के, 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणा-या दिव्यांग व्यक्तींच्या नावावर असणा-या मिळकतीस 50 टक्के,

ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टिम राबविणा-या मिळकतीस 5 ते 15 टक्के, स्वतंत्र नोंद असलेल्या निवासी मिळकतीस 10 टक्के, तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी यासाठी 5 टक्के सामान्यकरात सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी दिली. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत संपूर्ण बिलांची रक्कम भरण्यास केल्यास संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवा यांचे नावे मालमत्तांना चालू वर्षाच्या मालमत्ता करात 100 सवलत दिली जाणार आहे. संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांना चालू वर्षाच्या मालमत्ता करात 100 टक्के सवलत देण्यात आली आहे.

ऑनलाईनसाठीही ऑफर

डिजीटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी 30 जून 2019 अखेर मिळकत कराचा ऑनलाईन भरणा केल्यास चालु वर्षाचे मागणीतील सामान्य करात 5% सवलत (अनुक्रमांक 01 ते 05 सवलत योजनांकरिता) व त्यापुढे 31 मार्च 2020 अखेर मिळकत कराचा ऑनलाईन भरणा केल्यास चालू वर्षाचे मागणीतील सामान्य करात 2% सवलत देय राहील.

मिळकतधारकांना 16 करसंकलन विभागीय कार्यालय, महापालिकेची 8 क्षेत्रिय कार्यालये व www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंट गेट-वे द्वारे मिळकतकराचा भरणा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी मिळकत कराचा भरणा करुन सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.