Talegaon Dabhade : मोडी लिपीतील180 वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अभयपत्र सापडले

इंद्रायणी महाविद्यालयाच्या इतिहास विभागात अभ्यासासाठी जतन करून ठेवले जाणार

एमपीसी न्यूज- सुमारे 180 वर्षांपूर्वीचे मोडी लिपीतील दुर्मिळ अभयपत्र तळेगाव दाभाडे येथील संभाजी भेगडे यांच्या निवासस्थानी सापडले असून, ब्रिटिश काळातही दाभाडे सरकार राजघराण्याचा अंमल येथील इलाख्यात कायम असल्याचा पुरावा हाती लागला आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख तथा इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी त्याचे मोडी वाचन केले असून हे अभयपत्र इंद्रायणी महाविद्यालयाच्या इतिहास विभागात अभ्यासासाठी जतन करून ठेवले जाणार आहे.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार कृष्णराव भेगडे आणि खजिनदार चंद्रकांत शेटे यांच्या हस्ते इंद्रायणी महाविद्यालयात सोमवारी (दि. 22) या ऐतिहासिक, अप्रकाशित अभयपत्राचे प्रकाशन करण्यात आले. पराक्रमी दाभाडे सरकार घराण्याचा उज्ज्वल इतिहास आणि समाजातील सर्व जातीधर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीची राज्यव्यवस्था यावर प्रकाश टाकणारे संशोधनपर साहित्यिक दस्तावेज असलेल्या मावळच्या समग्र इतिहास ग्रंथात ते समाविष्ट करण्यात आले असून येत्या 16 मे रोजी ग्रंथाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती कृष्णराव भेगडे यांनी यावेळी दिली.
यावेळी चंद्रकांत शेटे, प्राचार्य संभाजी मलघे, प्रा. आर. आर. डोके, प्रा. डॉ. प्रमोद बोराडे आणि एस वाय लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अभयपत्राची मूळ प्रत 3 फूट लांब व 10 इंच रुंद आहे. अत्यंत उठावदार व चिटणीसी वळणाची मोडिलिपी आणि लेखन मर्यादेची मोहोर त्यावर पाच ठिकाणी आहे. सन 1840 चा हा जमीन हस्तांतरण दस्त तत्कालीन सरकार राजश्री बाबुराव दाभाडे सेनापती यांनी सदू रघोजी भेगडे यांस अभयपत्र म्हणून दिला आहे. पत्रातील मजकुरावरून तळेगाव दाभाडे मधील आंग्लकालीन जनजीवन आणि राज्यव्यवस्था यातील वास्तव समोर आले असल्याचे प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी सांगितले.

तळेगाव दाभाडे राजवाडा परिसरात दाभाडे सरकार यांचे बारा बलुतेदारांसह असलेले शासन केंद्र, पेठांच्यात वसलेली मुख्य बाजारपेठ, तेली समाजाचे मोठ्या संख्येने वास्तव्य आणि व्यापारातील योगदान, ब्रिटिशांचा भारतभर अंमल असतानाही दाभाडे सरकारांची जनाधार असलेली राज्यव्यवस्था आदी बाबींचा उजागर या अभयपत्राने झाला असल्याचे प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ६९ वर्षात दाभाडे सरकारांच्या कारभारावर ठोस प्रकाश टाकणारे हे प्रथम ऐतिहासिक पत्र इंद्रायणी महाविद्यालयाच्या इतिहास विभागात अभ्यासासाठी जतन करून ठेवले जाणार असून जर कोणाकडे मोडीलिपीतील अशी पत्रे, कागदपत्रे असतील तर ती या इंद्रायणी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाकडे सुपूर्त करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

संभाजी रामचंद्र भेगडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत वसुली विभागात ‘कर लिपीक’म्हणून काम करीत आहेत. आजोबा अप्पाजींच्या आधीपासून हे मोडी लिपीतील महत्वाचे दस्त घरात महत्वाच्या कागदपत्रात होते, असे संभाजी भेगडे यांनी सांगितले. ते म्हणाले, “कदाचित आमच्या पूर्वजांना ते मिळाले असेल. मोडी लिपीतील दस्त मी लहानपणापासून घरातील कागदपत्रात पाहतो आहे. मोडी लिपीतील हे दस्त वाचता येत नसल्याने आणि घरात ठेवून याचे करायचे काय या भावनेने हे दस्त इतिहास संशोधक डॉ.प्रमोद बोराडे यांच्याकडे सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुपूर्द केले”

संभाजी भेगडे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.